नाशिक – गुवाहाटी येथील कामाख्या मंदिर देवीच्या भक्त मंडळींमध्ये प्रसिध्द असले तरी या मंदिराशी महाराष्ट्राचे राजकारणही जोडले गेल्याचे सर्वांना माहित असेलच. शिवसेना दुभंगल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट कामाख्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. तेव्हांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात कामाख्या मंदिराचा उल्लेख वारंवार येत असतो. हेच कामाख्या देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात एक आकर्षणाचे केंद्र राहणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण पंचक्रोशीत प्रख्यात श्री ओम गणेश मित्र मंडळाची स्थापना १९७६ साली झाली. मंडळाला यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने मंडळातर्फे देवीच्या ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री कामाख्या देवीच्या मंदिराचा देखावा तयार करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष रमेश शिरसाठ यांनी दिली. मंडळात एकूण ६० सभासद आहेत. विशेष म्हणजे, या ओम गणेश मंडळाचा पहिला अध्यक्ष मुस्लीम समाजातील होता. त्यांचे नाव अकबर शहा हे होते. ते आता हयात नाहीत. या मंडळात सर्वच जाती धर्मातील आणि वेगवेगळा व्यवसाय असलेले सभासद आहेत. यंदा रमेश शिरसाठ हे अध्यक्ष आहेत.
स्वागताध्यक्ष म्हणून संजय मालपुरे तसेच देखाव्याचे कामकाज विजय पगार हे पहात आहेत. संपूर्ण देखरेख माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ सभासद नंदकुमार खैरनार करत आहेत. पाच दशकांत मंडळाने आतापर्यंत उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तश्रृंगी देवी, श्री अमरनाथ गुफा, श्री क्षेत्र पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महाभारत यासारखे धार्मिक, सामाजिक व समाज प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत.
५० वर्षांच्या प्रवासात मंडळाने विविध आकर्षक तसेच समाजप्रबोधनपर देखावे सादर करून गणेशोत्सवाला वेगळे वैशिष्ट्य प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये या मंडळाच्या उपक्रमांविषयी उत्सुकता असते. तसेच तालुक्यातील, राज्यातील व देशपातळीवरील नैसर्गिक आपत्तीत नेहमीच आर्थिक व वस्तुरुपात मंडळाने मदतीचा हात दिला आहे. हे या मंडळाचे खास वैशिष्टये आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त यंदा मंडळाकडून आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराचा देखावा साकारला जात आहे. भारतातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या मंदिराची वास्तुशैली, रंगसंगती व वैशिष्ट्ये जपत हा देखावा उभारला जात आहे. त्यामुळे स्थानिक व परिसरातील नागरिकांना या मंदिराचे आपल्याच परिसरात दर्शन घेण्याची अनोखी संधी मिळणार आहे. हे शिल्प नाशिक येथील वास्तुविशारद महेश शेळके साकार करत आहेत. याशिवाय, गेल्या ५० वर्षांच्या प्रवासात मंडळाने केलेल्या उपक्रमांचा आढावा घेणारी स्मरणिका देखील प्रकाशित करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत मंडळाचा इतिहास, देखावे व सामाजिक उपक्रमांचा विस्तृत आढावा मांडला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम गणेश मित्र मंडळाचा देखावा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून धार्मिकता, कलात्मकता आणि सामाजिक संदेश यांचा संगम अनुभवण्यास गणेशभक्त उत्सुक आहेत.