नाशिक – हनी ट्रॅप प्रकरणात गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांच्या जावयाला रात्री पोलिसांनी पुण्यात रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतल्याने महाजन-खडसे वादाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. खडसे हे नेहमीच अमली पदार्थांविषयी बोलत असतात. कालच त्यांनी चाळीसगावमध्ये इतके अमली पदार्थ का मिळतात. का पकडले जातात, असे प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांचे जावई हा उद्योग चालवत असल्याचे उघड झाल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.
पुणे पोलिसांनी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले. हनी ट्रॅप प्रकरणावरून काही दिवसांपासून खडसे-महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईकडे या अंगाने पाहिले जात आहे. परंतु, विरोधकांचे हे आरोप महाजन यांनी फेटाळले. खडसे यांना ट्रॅप होईल याची कल्पना होती तर त्यांनी जावयाला सतर्क करायला हवे होते, असा टोला त्यांनी हाणला. जे झाले ते मान्य करायला हवे. कोणी चूक केली असेल तर त्याच्या गळ्यात पडेल. काही कारवाई झाली तर हे षडयंत्र असल्याचे बोलणे योग्य नाही. प्रत्येकवेळी षडयंत्र कसे होईल, असा प्रश्न उपस्थित करुन पुणे पोलिसांच्या तपासातून काय असेल ते उघड होईल, असे महाजन यांनी नमूद केले.
पुण्यातील रेव्ह पार्टीचे आयोजन खडसे यांच्या जावयाने केल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समजली. पोलिसांनी भ्रमणध्वनीची छाननी केल्यावर अनेक बाबी लगेच लक्षात येतील. या प्रकरणाची चौकशी होऊन पोलिसांनी कारवाई करायला हवी. कुभांड रचल्याचा आक्षेप महाजन यांनी फेटाळला. पार्टीसाठी कोणी निरोप दिला, कोणी पार्टीला बोलावले. खडसेंचे जावई म्हणजे लहान मूल नाही की कडेवर घेतले आणि तिथे नेवून ठेवले, असा चिमटाही महाजन यांनी काढला. पुण्यात छापा पडलेल्या ठिकाणी हुक्का व मद्य सापडल्याचे सांगितले जाते. पुणे पोलिसांशी आपला संपर्क झालेला नसल्याचे महाजन यांनी नमूद केले.
खडसे-महाजन वादाची मालिका
भाजपचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद नवीन नाही. मागील काही दिवसांत उभयतांकडून परस्परांना लक्ष्य केले जात आहे. हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी संबंध असल्याचा आरोप करीत मंत्री महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी खडसे यांनी केली आहे. हनी ट्रॅप प्रकरण दडपण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. मंत्री महाजन यांच्या बचावार्थ मग जळगावमधील भाजप आमदार एकवटले. त्यांनी खडसेंवर अतिशय कठोर शब्दांत टिकास्त्र सोडले.