नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अचूक व शुध्द मतदार यादी असण्यासाठी राबविलेल्या सर्वेक्षण मोहिमेंतर्गत जिल्ह्यात वर्षभरात एक लाख एक हजार १५ इतक्या मतदारांची नावे वेगवेगळ्या कारणास्तव वगळण्यात आली आहेत. यात मयत, स्थलांतरीत, एकसारखे छायाचित्र असणाऱ्यांसह दुबार नावांचा समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार १५३ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २४ लाख ७४ हजार ३३७ पुरुष तर, २२ लाख ७३ हजार ७०२ स्त्री मतदार आहेत. ११४ अन्य मतदार आहेत. जिल्ह्यात ४७३९ मतदार केंद्र आहेत. विशेष पुनर्रिक्षण कालावधीत २७ ऑक्टोबर २०२३ ते पाच जानेवारी २०२४ या कालावधीत ७३ हजार इतक्या मतदारांची नावे वगळली गेली. तर पाच जानेवारी २०२३ ते पाच जानेवारी २०२४ या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत एकूण एक लाख एक हजार १५ इतक्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मतदार यादी शुध्द करण्यासाठी जुलै ते ऑगस्ट या कालावधीत मतदारांच्या घरोघरी जाऊन केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवली होती. त्यात ४२ हजार ९५१ मयत मतदार आढळून आले होते. त्यांची नावे वगळली गेली. तसेच कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेले २५ हजार ४२३ इतक्या मतदारांपैकी १७ हजार ६५६ इतक्या मतदारांची तपासणी करून वगळणी करण्यात आली. एकसारखे छायाचित्र असणारे ४९ हजार ३८ इतके मतदार तपासण्यात आले. त्यापैकी १७ हजार २७२ इतक्या मतदारांची नावे वगळण्यात आली. एकापेक्षा जास्त नावे असलेली १४ हजार ८०९ मतदारांची तपासणी करून त्यातील ३४३९ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
विशेष पुनर्रिक्षण कालावधीत २७ ऑक्टोबर २०२३ ते पाच जानेवारी २०२४ या कालावधीत ७३ हजार इतक्या मतदारांची नावे वगळली गेली. तर पाच जानेवारी २०२३ ते पाच जानेवारी २०२४ या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत एकूण एक लाख एक हजार १५ इतक्या मतदारांची नावे वगळण्यात आली.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला? निवडणूक आयोगाचं पत्र काय आहे?
८५ हजार जणांकडून दुरुस्ती
मतदाराच्या तपशीलात अर्ज क्रमांक आठ भरून दुरुस्ती करता येते. विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कालावधीत एकूण ३५ हजार ३९२ मतदारांनी अर्ज क्रमांक आठ भरून त्यांच्या मतदार तपशीलात दुरुस्ती केली. तर २०२३ संपूर्ण वर्षात ८५ हजार १७१ मतदारांनी हा अर्ज भरून मतदार तपशीलात दुरुस्ती केल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.