मालेगाव : गेली काही दिवस कथित ‘मत चोरी’ हा विषय लावून धरणारे माजी आमदार व ‘इस्लाम’ पक्षाचे प्रमुख आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मालेगाव येथे भर पावसात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भाजपकडून देशभरात मतांचा घोटाळा केला जात असून गेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदार संघात भाजपच्या साथीने ‘मत चोरी’करूनच ‘एमआयएम’ पक्षाने विजय मिळविला,अशी टीका शेख यांनी यावेळी बोलताना केली. ‘एमआयएम’ हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचे प्रत्यंतर वारंवार येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आसीफ शेख हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. त्यानंतर सलग दोनदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘इस्लाम’ हा स्वतंत्र पक्ष त्यांनी स्थापन केला. या निवडणुकीत ‘एमआयएम’चे मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून त्यांचा १६२ मतांनी निसटता पराभव झाला. हा पराभव मत चोरीमुळे झाला, असा आरोप ते सातत्याने करीत आहेत. ही मत चोरी सिद्ध करून देण्यास आपण समर्थ आहोत, असे आव्हानही त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेले आहे.

यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी एस. चोकलिंगम यांची मुंबईत भेट घेऊन लेखी तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी याच विषयावरून येथे जाफर नगरपासून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले होते. विशेष म्हणजे, मोर्चा सुरू झाल्यावर जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. परंतु घोषणाबाजी करत मोर्चातील कार्यकर्त्यांनी आगेकूच कायम ठेवली. म्युनिसिपल हायस्कूलजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी आसिफ शेख व अन्य वक्त्यांनी मत चोरी विषयावरून सत्ताधारी भाजप आणि प्रतिस्पर्धी एमआयएम या दोन्ही पक्षांना लक्ष्य केले.

मालेगाव मध्य विधानसभा मतदार संघात ४२ हजारावर बोगस मतदार नोंदविण्यात आल्याचा शेख यांचा आरोप आहे. मतदार यादीत नाव नोंदविताना मतदारांचा पत्ता आवश्यक असतो. परंतु कोणताही पत्ता नसलेल्या जवळपास २८ हजार मतदारांची नावे मालेगाव मध्य मतदार संघात अस्तित्वात असल्याची तक्रार त्यांनी केली.

पत्त्याच्या रकान्यात कोरी जागा,एक शुन्य,दोन शुन्य,किंवा नुसती रेष असे प्रकार असल्याचे त्यांनी निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. या मतदार यादीत ११ हजारांहून अधिक मतदारांची दुबार किंवा तिबार नावे आहेत. तसेच या यादीत साडेतीन हजारावर मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट असल्याचे शेख यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्य मतदार संघात तब्बल ४० हजारावर मतदारांची भर पडली. जेमतेम सहा महिन्याच्या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने मतांची वाढ कशी होऊ शकते, याबद्दल शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मतदार यादीत बोगस नावे समाविष्ट असणे याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यावर शेख यांनी ठपका ठेवला. शहरातील जवळपास ५० टक्के बीएलओंनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, काही जणांनी विशिष्ट राजकीय पक्षाला मदत होईल,अशी भूमिका निभावल्याची तक्रार शेख यांनी केली. ऑनलाइन मतदार नोंदणी केल्यावर अर्जदाराने दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याची जबाबदारी बीएलओंची असते.

संबंधित अर्जदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आला नाही किंवा त्याने दिलेली माहिती चुकीची असेल तर नियमानुसार बीएलओंकडून मतदार नोंदणी नाकारली जाणे अपेक्षित असते. मात्र तसे केले गेले नसल्याने मालेगावात मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार समाविष्ट झाले, असा आक्षेप शेख यांनी घेतला आहे. बोगस मतदारांची नावे वगळण्यात यावी तसेच यात दोषी असणाऱ्या बीएलओंवर कारवाई करावी, असा आग्रह शेख यांनी यावेळी बोलताना धरला.