मालेगाव : शाळा सुटल्यावर घरी परतणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर १२ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावरील सोग्रस गावाजवळ घडली. जखमी विद्यार्थ्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय आणि पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला. त्यामुळे महामा्र्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी ठप्प झाली होती.

शाळा सुटल्यानंतर एकूण १३ विद्यार्थी सोबत रस्त्याच्या कडेने घराकडे निघाले होते. पाठीमागून पिंपळगावकडे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात सर्वच विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना गावकऱ्यांनी तातडीने चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तसेच गंभीर जखमींना नंतर पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तेथे अक्षय महाले (१६) या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

टेम्पो चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आणि वाहनावरून त्याचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात घडत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाला वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या अपघातानंतर ग्रामस्थांच्या संतापात भर पडली व त्याचे पर्यवसान रास्ता रोको करण्यात झाले.

मृत व जखमी विद्यार्थी हे सोग्रस येथील अजित दादा पवार विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. ओमकार आहेर (१६), पायल गांगुर्डे (१५), लक्ष्मी गांगुर्डे (१६), सोनाली गांगुर्डे (१५), शुभम महाले (१४), शुभम पवार (१६), समृद्धी पवार( १६),वर्षा गोधडे (१६), मयूर महाले (१६), रोहित पवार (१५), संगीता गांगुर्डे (१५) अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना टेम्पोने धडक दिल्याची वार्ता समजल्यावर घटनास्थळी गावकऱ्यांचा मोठा जमाव जमला. संतप्त नागरिकांनी या ठिकाणी जवळपास दीड ते दोन तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहन चालकांना बराच वेळ तिष्ठत बसण्याची पाळी आली. नाशिक-धुळे मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांनाही या आंदोलनाचा फटका बसला.

शनिवारी रक्षाबंधन असल्याने बस गाड्यांमध्ये विशेषतः महिला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे बघावयास मिळाले होते. आंदोलनामुळे या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या आंदोलनामुळे शासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. आंदोलक ग्रामस्थांची समजूत काढताना या यंत्रणेचे नाकीनऊ आले होते.

या अपघाताची माहिती मिळताच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने व योग्य उपचार व्हावेत म्हणून त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. या प्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.