धुळे : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झाल्याने संपूर्ण मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या प्रकरणाचा निषेध करत आज धुळे शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

धुळे शहरातल्या शिवतीर्थ चौकात कार्यकर्ते एकत्र जमले आणि मुंढे यांच निषेध करत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भानुदास बगदे, विनोद जगताप, संदीप पाटोळे, सुधाकर बेंद्रे आदी या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुंडे यांना तात्काळ अटक करा व सीआयडीमार्फत या घटनेची चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.

जरांगे पाटील यांच्याविरुद्ध कट रचला गेल्याची माहिती सार्वजनिक झाल्यानंतर मराठा समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून राज्यातील गृह खाते याबाबत निष्क्रिय आहे असा आरोप यावेळी करण्यात आला. एवढ्या गंभीर प्रकरणात कारवाई न झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणास मुख्यमंत्री जबाबदार असून गृह खात्याचे हे अपयश आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

या आंदोलनात निंबा मराठे, राजेंद्र काळे, किशोर वाघ, गोविंद वाघ, नरेंद्र हेमाडे, मनोज ढवळे, वामन मोहिते, सुरेश पवार, उल्हास पाटील, प्रफुल्ल माने, उल्हास यादव, श्यामभाऊ रायगुडे, वीरेंद्र मोरे, जितू जगताप, देवा पवार, नितीन पाटील, दिनेश चव्हाण, भरत वाघारे, गिरीश चव्हाण, संतोष लकडे, भूषण बागुल, विक्रम काळे, मनोज रुईकर, भानुदास चौधरी, सुनील थाणगे आणि रवी नागणे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.

या संदर्भात राज्य सरकारकडून तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलनादरम्यान समाजातील नेत्यांनी दिला. धुळे शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.