‘मराठा आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका मांडावी’

नाशिक : मराठा आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्य सरकार परस्परांवर जबाबदारी ढकलत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी समाजाची दिशाभूल न करता स्पष्ट भूमिका मांडावी, असे मत व्यक्त करत, भाजपचे खासदार संभाजी राजे यांनी ‘‘पंतप्रधानांकडे चार वेळा पत्र देऊन भेटीसाठी वेळ मागितली, पण अद्याप वेळ मिळाली नाही’’, अशा शब्दांत भाजपला घरचा आहेर दिला.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या संभाजी राजे यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काय तोडगा काढणार, हे आता राज्य-केंद्र सरकारने स्पष्ट करावे. या संदर्भात २७ तारखेला मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांशी भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. तोपर्यंत समाजाने शांत राहावे. मराठा समाजाने ५८ मोर्चे, आंदोलने करून आपली भूमिका मांडलेली आहे. केंद्रात भाजपने भूमिका घ्यावी. मराठा समाजाच्या भावनेशी खेळू नये. यावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मागील सरकारने मराठा आरक्षणासाठी बनावट कायदा केला काय किं वा सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने भूमिका मांडली नाही काय, याच्याशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. मराठा समाजाची दिशाभूल कराल तर आपण आडवे येऊ, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आमदार-खासदारांनी माझे-तुझे केले तर बघाच, असा इशाराही त्यांनी दिला.