जळगाव : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते संधी मिळेल तेव्हा कव्वाली सादर करण्यासह मिरवणुकीत ठेका धरण्यासही कधीच मागे पुढे पाहत नाहीत. जळगावमध्ये पोलिसांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धेच्या समारोपावेळी तर ते थेट मैदानात उतरले. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर त्यांनी रस्सीखेच खेळण्याचा आनंद लुटला.
जिल्हा पोलीस दलामार्फत ३६ वी जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्या माध्यमातून फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटनसह विविध खेळांचे थरारक सामने रंगले. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनातून जिल्हा पोलीस दलाने क्रीडा, संघटन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात आपली छाप उमटवली. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षिस वितरण समारंभ पोलीस कवायत मैदानावर पार पडला. विविध खेळांमध्ये कौशल्य दाखवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तसेच संघांना पदके आणि ट्रॉफी देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि इतर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस दलात तंदुरूस्ती, शिस्त, संघ भावना आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी, अशा क्रीडा स्पर्धांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पाटील यांनी केले. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी पालकमंत्रीपदाचा बडेजाव न मिरवता थेट डोक्यावर खेळाडूंसाठी असलेली टोपी घातली. आणि ते मैदानात रस्सीखेच स्पर्धेत सहभागी झाले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मिसळून खेळाचा आनंद घेतला. रस्सीखेच स्पर्धेत मंत्र्यांनी खेळाडूंसह ताकदीने सहभाग घेतल्याचे दृश्य पाहून प्रेक्षकांकडूनही जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांच्या या सहभागामुळे पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. पालकमंत्र्यांनी थेट मैदानात उतरून खेळात घेतलेला सहभाग आमच्यासाठी प्रेरणादायी क्षण होता, अशी प्रतिक्रिया नंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली.
पोलिसांच्या मुलांचा स्पर्धेत सहभाग
पोलीस दलाच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेदरम्यान अधिकारी-कर्मचारी यांच्या मुलांसाठी आयोजित विविध प्रकारच्या स्पर्धा विशेष आकर्षण ठरल्या. मुलांच्या लिंबू चमचासह धावणे आणि इतर बऱ्याच स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मुलांना सुद्धा मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. पालक म्हणून आलेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांचा खेळातील सहभाग पाहून त्यांना कौतुकाने दाद दिली. या उपक्रमामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्येही मोठा उत्साह दिसून आला.