धुळे : दोंडाईचा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतून बाद झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार शरयु एकनाथ भावसार यांनी प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर थेट हस्तक्षेपाचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक हवी, मात्र वाढत्या राजकीय दडपशाहीमुळे लोकशाहीचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या राजकीय प्रभावाखाली असलेल्या दोंडाईचा – वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत शरयु एकनाथ भावसार यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नयनकुंवर रावल यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभ्या ठाकल्या होत्या. अर्ज छाननी प्रक्रियेत शरयु भावसार यांचा अर्ज बाद ठरवून नयनकुंवर रावल या नगराध्यक्ष पदासाठी बिनविरोध झाल्याचे जाहीर झाले. यामुळे नयनकुंवर रावल यांच्या बिनविरोधाचा जल्लोष खुद्द पालक मंत्री जयकुमार रावल यांनीही केला.
यासंदर्भात आज शरयू भावसार यांनी अर्ज छाननी प्रक्रिया कशी आक्षेपार्ह आहे यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.नगरपालिकेच्या अधिकृत दाखल्यात शरयू भावसार यांच्या नावे कोणतीही थकबाकी नसल्याचे स्पष्ट नमूद होते. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करूनही तो बाद कसा झाला, असे करणे हा सत्तेच्या दाबाचे द्योतक असल्याचे शरयू भावसार यांचे म्हणणे आहे.
पालकमंत्री जयकुमार रावल यांनी राजकीय प्रभावाचा वापर केला आणि प्रशासनावर दबाव आणला गेला, असा आरोपही त्यांनी केला आहे. हा प्रकार लोकशाहीला बाधा आणणारा आणि नागरिकांच्या मताधिकारावर गदा आणणारा त्यांचे म्हणणे आहे. आपली उमेदवारी ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नसून दोंडाईचा शहरातील सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न होता. शहरात बिनविरोध वातावरण तयार करण्याचे राजकीय प्रयत्न सुरू आहेत. हे माहिती झाल्याने असे प्रयत्न रोखण्यासाठी आणि नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा यासाठी आपण शेवटच्या क्षणी उमेदवारी दाखल केली होती.
मात्र, सत्ताधाऱ्यांनी प्रभाव टाकून तिथे अडथळे निर्माण केले, असाही त्यांचा आरोप आहे. भावसार यांनी धक्कादायक आरोप करताना सांगितले की, काही उमेदवारांच्या सुचकांना धमक्या देणे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवून ठेवणे, तसेच मानसिक दबाव आणणे अशा घटना घडल्या. हे प्रकार निवडणूक प्रक्रियेचा मानघात करणारे असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, शैलेश सोनार आणि काँग्रेसचे राहुल माणिक व स्थानिक कार्यकर्त्यांचे सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सत्तेच्या दडपशाहीमुळे अनेकजण मौन बाळगत असले तरी सामान्य कार्यकर्ते न्यायासाठी उभे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जनता एकत्र आली तर कोणतीही दडपशाही टिकू शकत नाही. इंग्रजांना पराभूत करणाऱ्या जनतेने आजही सत्तेच्या अतिरेकी धोरणांना उत्तर देण्याची ताकद ठेवली आहे. दोंडाईचा शहरातील मतदारांनी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम अधिक गडद आणि लढती आणखीनच रंगातदार ठरू लागल्या आहेत. आरोप -प्रत्यारोपांमुळे निवडणूक क्षेत्रात सुरु झालेल्या राजकीय धुळवडीचा आनंद घेणारे हिरीरीने सहभागी होऊ लागले आहेत.
