नाशिक – रामसर दर्जा मिळालेल्या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात वन विभागाच्या वतीने पावसाळ्यातील पक्षी गणना करण्यात आली. नांदूरमध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरुडगाव, काथरगांव यांसह एकूण सात ठिकाणी केलेल्या निरीक्षणात सहा हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. वनविभागाच्या वतीने नुकतीच पक्षी गणना करण्यात आली. यात पाणपक्ष्यांची संख्या चार हजार १००, झाडावरील गवताळ भागातील पक्षी २,८०० असे एकूण ६,९०० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये स्थलांतरित वॉटरकॉक पक्ष्याचे दर्शन झाले. तसेच काळा तपस, पिवळा तपस आणि लाल तपस हे तीन प्रकारचे बीटर्न पक्षी देखील बघावयास मिळाले. पावसाळ्यात अभयारण्यात हळदीकुंकू, वारकरी, सूर्यपक्षी, जांभळी पाणकोंबडी, काळी पाणकोंबडी, राखी बगळा, आदी पक्ष्यांची विणदेखील बघावयास मिळाली. स्थानिक उघड्या चोचीचा बगळा, राखी बगळा, स्पॉट बिल डक, स्पुनबिल, शेकाट्या, नदीसुरय,खंड्या आदी पक्षी आढळून आले.

हिवाळ्यात या परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होते. ३१० पेक्षा अधिक जातीचे पक्षी या ठिकाणी बघावयास मिळतात तसेच ६५ जातीचे मासे आणि ५०० पेक्षा जास्त वनस्पती देखील या अभयारण्यात आहेत. अभयारण्याच्या विविध निरीक्षण मचाणांवरून पक्षीमित्रांच्या सहकार्याने गणना करण्यात आली. सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, वनपाल रुपेश दुसाने, वनरक्षक जी. के. पाटील, के. डी. सदगीर, नेचर क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, उमेशकुमार नागरे, अमोल दराडे आदी सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.