जळगाव : शहरातील लोकेश संजय भालेराव आणि दर्पण संजय भालेराव या बंधुंनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत एकाच वेळी यशाला गवसणी घातली आहे. पैकी लोकेशने ४५ वा क्रमांक, तर दर्पणने ९५ वा क्रमांक पटकावत आई-वडिलांसह जळगाव शहराचा नावलौकिक वाढवला आहे.
भालेराव बंधूंचे वडील संजय काशिनाथ भालेराव हे सध्या जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. शिक्षणाची ओढ आणि प्रामाणिकपणा हे संस्कार बालपणापासून घरातूनच लाभल्यामुळे दोन्ही भावांनी आपल्या वाटचालीत शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवले. शासकीय सेवेची प्रेरणा वडिलांपासून मिळाली.
जळगावमधील रावसाहेब रूपचंद विद्यालयात दोघांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लोकेश याने पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेकॅनिकल इंजिनिअरींग विषयातून बी.टेकची पदवी संपादित केली. तर दर्पण याने पुणे येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून बीई कॉम्पुटर इंजिनिअरिंगची पदवी संपादित केली.
पदवीनंतर प्रारंभी दोघे भाऊ खासगी क्षेत्रात कार्यरत होते; परंतु, समाजासाठी काही तरी करण्याची प्रेरणा आणि शासकीय सेवेची ओढ यामुळे दोघांनी कालांतराने स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारला. मागील काही वर्षांपासून सातत्याने अभ्यास करताना त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी, अपयश, आणि तणावाचे क्षण आले. परंतु, त्यांनी कधीच हार मानली नाही.
अभ्यास एके अभ्यास हा मंत्र स्वीकारून कोणत्याही खासगी मार्गदर्शकाविना, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले. सध्या लोकेश जलसंपदा विभागात सहायक अभियंता (श्रेणी-२) म्हणून कार्यरत आहे, तर दर्पण याचीही वर्ग एक अधिकारी पदावर नियुक्ती निश्चित झाली आहे. एकाच वेळी दोन्ही भाऊ आता वर्ग एकचे अधिकारी झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावर आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केल्याचे समाधान स्पष्टपणे दिसते.
भालेराव बंधूंचे यश हे त्यांचे वैयक्तिक यश नाही, तर जळगावसारख्या लहान शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशा या गोष्टींनी कोणतेही ध्येय गाठता येते, हे दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
ध्येय निश्चित करून त्या दिशेने एकाग्रतेने वाटचाल करा. कुटुंब आणि मित्रांचा आधार घ्या. कारण, मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी संवाद आवश्यक आहे. अपयशाला शिकवणीसारखे घ्या आणि चुका ओळखून त्यात सुधारणा करा. सहअभ्यास आणि परस्पर प्रेरणा या गोष्टी यशाचा पाया ठरतात. ग्रामीण पार्श्वभूमी ही अडथळा नाही. जिद्द आणि प्रयत्न असतील तर यश निश्चित मिळते, हा संदेश दोन्ही भावांनी यशाला गवसणी घातल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांना दिला आहे.
