नाशिक – जिल्ह्यातील लासलगाव आगाराचे संजय काळे आणि कळवण आगाराचे दत्तु बोके यांचा २५ वर्षापासून विनाअपघात राज्य परिवहन महामंडळाची सेवा केल्याने स्वातंत्र्यदिनी सत्कार करण्यात आला.
राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी अखंड राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत येथील विभागीय कार्यालयात विभाग नियंत्रक किरण भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नाशिक विभागात २५ वर्ष विनाअपघात राज्य परिवहनची सेवा केल्याने लासलगाव आगाराचे चालक संजय काळे आणि कळवण आगाराचे चालक दत्तू बोके यांचा रुपये २५ हजाराचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या पत्नीस साडी देण्यात येऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बसमध्ये चढ-उतार करतांना होणारी घाई आणि गर्दी पाहता अनेकदा काही सामान विसरले जाते. परंतु, त्या वस्तु संबंधितांच्या हातात विश्वासाने देणारे महामंडळाचे कर्मचारी आहेत.
नाशिक -१ आगाराचे वाहक अमोल रावते त्रंबकेश्वर बस स्थानक येथे कार्यरत असताना वयोवृद्ध प्रवाशाचे हरवलेले १३,५०० रुपये परत केल्याने तसेच नाशिक-१ आगाराचे वाहक सुप्रिया काकड यांनी विनावाहक नाशिक- धुळे बसची तिकीट नोंदणी करत असताना एका प्रवाशाची नोंदणीच्या ठिकाणी विसरलेली बॅग त्यांना दिसली. त्या बॅगेत ४७ हजार रुपये आणि तीन तोळे सोन्याची चेन होती. त्यांनी ती बॅग संबंधित प्रवाशास परत केली.
अक्कलकोट येथे कार्यरत असताना चालक नामदेव गांगोडे आणि वाहक संदीप गोंधडे यांना बसमध्ये बेवारस बॅग आढळून आली. बॅगेत दोन हजार १०० रुपये होते. ही रक्कम त्यांनी संबंधित प्रवाशास परत केली. या सर्व कर्मचाऱ्यांचा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नाशिक विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.