नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सराफी व्यापाऱ्याचे अपहरण करुन त्याच्याकडील ६० लाखांचा ऐवज लुटणाऱ्या पाच संशयितांना नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. अतिशय आव्हानात्मक तपासाच्या या प्रकरणात अन्य संशयित फरार असल्याने त्यांचा मागोवा पोलिसांकडून काढला जात आहे.शहादा शहरातून म्हसावदकडे मोटारीतून जाणाऱ्या रितेश पारेख या सराफाचे २७ नोव्हेंबर रोजी बंदुक आणि धारदार शस्त्र दाखवून अपहरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे रितेशला त्याच्या चारचाकी गाडीसहीत घटनास्थळाहुन पळविण्यात येवून त्याच्या ताब्यातील सोने, चांदी , रोकड असा ६० लाखांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता. रितेशला धुळेनजीकच्या नवलनगर परिसरात सोडून देत दरोडेखोरांनी पोबारा केला. दिवसाढवळ्या झालेल्या या अपहरण आणि दरोडा नाट्यनंतर नंदुरबार पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
या गुन्ह्याचा तपास करतांना घटनेच्या पाचच दिवसात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यातील पाच संशयितांना जेरबंद केले. या गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीला अपघात झाल्यानंतर ती मोटार एका निनावी ठिकाणी सोडून दरोडेखोरांनी पोबारा केला होता. याच मोटारीच्या चेसीस नंबरवरुन याच्या खरेदीदाराचा मागोवा घेत पोलिसांचे हात थेट संसयितांपर्यंत पोहचले. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी भरत गोविंद वडार, रोहित उर्फ गोल्या संजय मराठे, अक्षय पांडुरंग सोनार, पूर्वेश रमेश सोनवणे (सर्व राहणार शहादा) आणि निलेश नाना पवार (रा. धुळे) या पाच संशयितांना अटक केली. यांच्याकडून गुन्ह्यातील लंपास केलेल्या मालापैकी साडेचार किलो चांदी, रोख ५२४०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले.
या संशयितांकडून हस्तगत करण्यात आलेला माल दरोड्यात लंपास करण्यात आलेल्या मालाच्या अवघ्या १० टक्केच आहे. यातील अन्य संशयितांना पोलिसांचा सुगावा लागल्याने त्यांनी पोलीस येण्याच्या काही वेळेआधीच पोबारा केला. त्यामुळे या गुन्ह्यातील अन्य संसयितांचा शोध पोलीस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी या गुन्ह्यातील प्रमुख संशयितांना दरोडेखोरीसाठी पोषक मदत केल्याचे बोलले जाते. एका संशयिताने दरोड्यातील लंपास केलेला माल देखील खरेदी केल्याचे सांगितले जाते. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी या पाच संशयितांच्या अटकेला दुजोरा दिला असून अन्य आरोपींना लवकरच अटक केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर पोलींस अशाच पद्धतीने झालेल्या अन्य चोऱ्यांची मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.
