नंदुरबार – शहरात बुधवारी आदिवासी बांधवांनी काढलेल्या मूक मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात झालेल्या तोडफोड प्रकरणी आतापर्यत १४० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. यातील १३ जणांचा सहभाग आढळून न आल्याने त्यांना सोडून देण्यात आले.
दगडफेक आणि हल्ल्यात २५ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि सात इतर नागरिक जखमी झाले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नंदुरबारमध्ये ठाण मांडून असून नाशिक, जळगाव, धुळेसह अन्य ठिकाणाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जादा पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.
जय वळवी या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवारी मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा आटोपल्यानंतर काही समाजकंटकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तोडफोड आणि दगडफेक केली होती. पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडत जमावाला पांगवले. मोर्चेकऱ्यांची संख्या १५ हजारपेक्षा अधिक होती. आणि अवघा ४०० ते ५०० पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत सर्वाधिक मारही पोलिसांनाच खावा लागला.
दगडफेक आणि हल्ल्यात २५ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्यांची ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेराद्वारे तपासणी करुन संशयितांना अटक करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. या घटनेबाबत समाज माध्यमातून लोकांना भडकविणाऱ्यांविरुध्दही गुन्हे दाखल केले जात आहेत. नागरिकांनी शांता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. आतापर्यत पोलिसांनी तोडफोड प्रकरणी १४० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले. यातील १३ जण अल्पवयीन आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याने त्यांचा या घटनेशी सबंध न निघाल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले.
दरम्यान, ज्या हत्या प्रकरणामुळे या सर्व घटना घडल्या. त्यातील संशयित आणि पीडित या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे नंदुरबारमध्ये ठाण मांडून आहेत. जळगाव, धुळे , मालेगाव येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिसरातून अतिरीक्त पोलीस कुमक सध्या नंदुरबारमध्ये दाखल आहे. गुरुवारी शहरातील जनजीवन सुरळीत झाले असून व्यापारी दुकाने आणि शाळा, महाविद्यालयेदेखील उघडली. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. बुधवारच्या घटनेत २० ते २५ वाहनांची तोडफोड झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्याचा देखील पंचनामा सुरु करण्यात आला आहे.