नाशिक – शहरातील लहान रस्त्यांनी होणारी अवजड वाहनांची वाहतूक अपघातांना कारण ठरत असून मंगळवारी वडाळा रोडवर झालेल्या अपघातात अशाच एका अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हाजी लॉन्सजवळील मुमताज पार्कसमोर हा अपघात झाला. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
उड्डाणपुलाखालून वाहतूक होण्यासाठी करण्यात आलेला राणेनगरजवळील बोगदा सध्या बंद आहे. बोगदा रुंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांना लेखानगर किंवा पाथर्डी फाट्याच्या अलीकडे शिवसागर हॉटेलसमोरील भागातून ये-जा करावी लागते. अवजड वाहनांची वाहतूक यामुळे जिकिरीची झाली आहे. बऱ्याचदा नाशिकरोडकडून येणारी अवजड वाहने वडाळा, पाथर्डी रस्त्याने पुढे जातात. या रस्त्यावर विद्यालय, महाविद्यालय, सरकारी रुग्णालय, वित्तीय संस्थांचे जाळे आहे.
शाळा सुरू असतांना तसेच सुटतांना या ठिकाणी विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने, पालकांची वाहने यासह इतर वाहनांमुळे कायम वाहतूक कोंडी होते. या कोंडीत अवजड टीव्ही अनेक जण जखमी तर, काही जणांचे प्राण गेले आहेत. याबाबत परिसरातील रहिवासी तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने या रस्त्याने अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु, आंदोलनानंतर काही दिवस अवजड वाहतूक अन्य मार्गे किंवा विशिष्ट वेळेत ये-जा होते, कालातंराने पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते.
मंगळवारी या अनास्थेचा बळी १६ वर्षीय सुहाना शेख ही महाविद्यालयीन विद्यार्थी ठरली. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुहाना दुचाकीने महाविद्यालयाकडे जात असताना मागून भरधाव आलेल्या मालमोटारीची दुचाकीला धडक बसली. या धडकेत सुहाना मालमोटारीच्या मागील चाकाखाली सापडली. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने वाहतूक ठप्प झाली होती.चालकाने मद्यप्राशन केल्याची रहिवाशांची तक्रार आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यावर मुंबई नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनचालकाला ताब्यात घेतले. अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. अपघातामुळे वडाळा रस्त्यावर खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघातामुळे रस्त्यावरील अवजड वाहतूक तसेच वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील लहान, मोठ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर पुढेपर्यंत केलेले अतिक्रमण, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
वाहनचालकावर कठोर कारवाई करावी, अवजड वाहतूकीसाठी कठोर नियमावली करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अपघाताविषयी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.