Maratha Reservation: नाशिक – मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनापासून अंतर राखणाऱ्या जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसह लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात समेट घडल्यानंतर मात्र श्रेय घेण्यासाठी कुठलीही कसर ठेवली नसल्याचे पहायला मिळाले. सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयांचा शहर भाजपकडून आनंदोत्सव साजरा झाला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री माणिक कोकाटे, शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी निर्णयावर भावना मांडली. शिवसेना शिंदे गटाच्या गोटात मात्र शांतता होती.

मुंबईत जेव्हा मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हा सत्ताधारी पक्ष व त्यांच्या लोकप्रतिनिधींमध्ये कमालीची शांतता होती. सत्ताधारी पक्षातील मराठा आमदार देखील भूमिका मांडण्यास तयार नव्हते. जिल्ह्यात १५ पैकी निम्म्याहून अधिक मतदारसंघात मराठा समाजाचे आमदार आहेत. यात राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे, नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे, नाशिक पूर्वचे राहुल ढिकले, निफाडचे दिलीप बनकर, देवळा-चांदवडचे आ. डॉ. राहुल आहेर यांचा समावेश आहे. देवळालीच्या आ. सरोज अहिरे वगळता कुणी मुंबईला निघालेल्या आंदोलकांची भेट घेण्यासही आले नव्हते.

यात महापालिकेतील मराठा समाजाच्या माजी नगरसेवकांचाही समावेश होता. दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींच्या बाजुने मैदानात उतरले होते. मराठा लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर सकल मराठा समाजातून नाराजी प्रगट झाल्यानंतर शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) खासदार राजाभाऊ वाजे यांनी घाईघाईत आपली पाठिंब्याची भूमिका मांडली. राष्ट्रवादीचे (शरद पवार) दिंडोरीतील खासदार भास्कर भगरे यांनी मुंबईत आंदोलनस्थळी जरांगे यांची भेट घेतली होती.

जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर मात्र सर्वपक्षीय सक्रिय झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल शहर भाजपने अशोक स्तंभ येथे आनंदोत्सव साजरा केला.‘धन्यवाद देवाभाऊ’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, महेश हिरे, सुरेश पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती.

राज्याचे क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांचा शासनाच्या उपसमितीत समावेश होता. मनोज जरांगे यांच्या समवेतच्या चर्चेत ते सहभागी झाले होते. कोकाटे यांनी उपसमितीसोबत झालेल्या चर्चेनंतर तातडीने शासन निर्णय जाहीर करण्यात आला. त्याची प्रत जरांगे यांना दिल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्याचे म्हटले आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सरकारचे अभिनंदन करताना हे आरक्षण कायदेशीर पातळीवर टिकण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वर्तुळात शांतता होती. त्यांनी भाजपप्रमाणे आनंदोत्सव साजरा केला नाही. यामुळे सरकारच्या निर्णयाचे श्रेय भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.