नाशिक : लोकसभेची नाशिकची जागा कुठल्याही परिस्थितीत मित्रपक्षाला मिळू नये म्हणून शिवसेना-भाजपमध्ये स्थानिक पातळीवर चाललेला संघर्ष ठाणेपाठोपाठ मुंबईत पोहोचला आहे. शिवसेना मंत्री, आमदार, खासदारांनी रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातल्यानंतर सोमवारी भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी सागर बंगला गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदारसंघात भाजपची ताकद असल्याने शिवसेनेला जागा देण्यास विरोध दर्शविला.

महायुतीत नाशिकच्या जागेवरून शिवसेना-भाजपमधील दरी दिवसागणिक वाढत आहे. उभय पक्षांमधील स्थानिक नेत्यांकडून परस्परांना लक्ष केले जात आहे. ही जागा भाजप वा राष्ट्रवादीला देऊ नये याकरिता शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार हेमंत गोडसे आदींनी रविवारी रात्री ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्ती प्रदर्शन केले होते.

हेही वाचा…साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

या घटनाक्रमानंतर सोमवारी भाजपच्या सीमा हिरे, देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले या आमदारांसह पदाधिकारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानावर पोहोचले. शिंदे गटाची स्थानिक पातळीवर ताकद नाही. दोनवेळा सेनेचे उमेदवार भाजपमुळे निवडून आले. या मतदारसंघाचा बहुतांश भाग शहरी असून तिथे भाजपचे वर्चस्व आहे. भाजपच्या ताब्यात तीन विधानसभा मतदारसंघ, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आहे. नाशिक महापालिकेत एकहाती सत्ता होती. जवळपास १०० नगरसेवक व बुथस्तरीय यंत्रणा आहे. स्थानिक पातळीवर भाजपची ताकद असून हा मतदारसंघ शिवसेनेला देऊ नये, अशी भूमिका संबंधितांनी मांडली. जागा वाटपात यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे आमदार हिरे यांनी सांगितले.