नाशिक : महाविकास आघाडीत ‘नाशिक मध्य’ जागेवरून निर्माण झालेला तिढा अखेर सोडविण्यात आला असून मागीलवेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसऐवजी जागा वाटपात ती आपल्याकडे खेचून घेण्यात शिवसेना (उध्दव ठाकरे) यशस्वी झाली आहे. या जागेसाठी पक्षाने माजी आमदार वसंत गिते यांना एबी अर्ज दिल्यानंतर काँग्रेसच्या इच्छुक डॉ. हेमलता पाटील यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले. नाशिक पश्चिममधून ठाकरे गटाने जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गट-भाजप यांच्यात लढत होणार आहे.

नाशिक मध्य विधानसभेच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडे बरीच रस्सीखेच सुरू होती. महाविकास आघाडीने हा पेच सोडविला असला तरी महायुतीत तो सायंकाळपर्यंत कायम होता. महाविकास आघाडीत नाशिक मध्यवर तीनही पक्षांनी दावा ठोकल्याने पेच निर्माण झाला होता. मागीलवेळी काँग्रेसने ही जागा लढविली होती. त्यांच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. त्यामुळे या जागेवरील हक्क काँग्रेस सोडण्यास तयार नव्हती. दुसरीकडे ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला होता. माजी आमदार वसंत गिते यांना भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश देताना या जागेसाठी शब्द दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे काँग्रेस-ठाकरे गट या जागेसाठी अडून बसले असताना शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने तीनही पक्षांनी प्रत्येकी एकेक जागा लढविण्याची सूचना केली होती. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर ही जागा ठाकरे गटाच्या पारड्यात पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा… अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम

बुधवारी दुपारी नाशिक मध्यसाठी वसंत गिते आणि नाशिक पश्चिम मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना एबी अर्ज दिला गेला. हक्काची जागा सोडल्याने काँग्रेसच्या स्थानिक वर्तुळात नाराजी आहे. या मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. हेमलता पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड, इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी इच्छुक होते. काँग्रेस ही जागा कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे वरिष्ठांकडून सांगण्यात आले होते. तथापि, अखेरच्या क्षणी ठाकरे गटाकडे जागा गेली. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेण्यात आला असला तरी आपण निवडणूक लढविणार असल्याचे डॉ. हेमलता पाटील यांनी सांगितले.

हे ही वाचा… बंडात साथ देणाऱ्यांना संधी; शिवसेनेची दादा भुसे, सुहास कांदे यांना उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाशिक पश्चिममध्ये ठाकरे गट-भाजप सामना

नाशिक पश्चिममधून शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांंना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि ठाकरे गटाचे बडगुजर यांच्यात लढत होईल. भाजपचे माजी गटनेते दिनकर पाटील यांनी बंडखोरी करण्याचे जाहीर केले आहे. भाजपच्या काही इच्छुकांनी मनसेशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. पुढील काही दिवसांत याची स्पष्टता होऊन लढतीचे चित्र स्पष्ट होईल.