नाशिक : भाजीपाला विक्री करण्यासाठी आलेल्या वैजापूर येथील शेतकऱ्याला टोळक्याने मारहाण करुन लुटल्याची घटना पंचवटीतील दिंडोरी रस्त्यावरील मार्केट यार्ड भागात घडली. या घटनेत संशयितांनी २१ हजाराची रोकड बळजबरीने हिसकावून घेतली. पोलिसांनी एकाला अटक केली.
याबाबत सूरज ब्रम्हाणावत (२७, संजयपूरवाडी, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर) या युवकाने तक्रार दिली. शिवा उर्फ गुंग्या वळवी (१९, राठी गल्ली, कालिकानगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ब्रम्हाणावत दिंडोरी रस्त्यावरील मार्केट यार्डात वांगे आणि कारले विक्री करण्यासाठी आले होते. लिलावानंतर रात्री आपल्या मालवाहू वाहनात रिकाम्या जाळ्या ठेवत असताना चार जण आले.
दमदाटी करीत ब्रम्हाणावत यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त टोळक्याने मारहाण केली. त्यांच्या खिशातील सुमारे २१ हजार रुपये बळजबरीने काढून घेत पलायन केले. जखमी झालेल्या ब्रम्हाणावत यांनी कसेतरी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
त्र्यंबक रस्त्यावरील पिंपळगाव बहुला भागात कंटेनरच्या धडकेत २६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सौरभ मुळाणे (पिंप्री माळेगाव, त्र्यंबकेश्वर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. मुळाणे बुधवारी सायंकाळी नाशिकहून पिंप्रीच्या दिशेने दुचाकीवर निघाले होते. पिंपळगाव बहुला शिवारात भाऊसाहेब भावले यांच्या घराजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरची दुचाकीस धडक बसली. या अपघातात मुळाणे गंभीर जखमी झाला होता. नातेवाईकांनी त्याला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल नेले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
प्राप्तीकर विभागात नोकरीच्या आमिषाने गंडा
प्राप्तीकर विभागात अधिकारी पदावर नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एकाने बेरोजगार युवकाला लाखो रुपयांना गंडा घातला. याबाबत भाऊसाहेब आंबेकर (सदगुरूनगर, नाशिकरोड) यांनी तक्रार दिली. उमेश निकम (पारेगाव, चांदवड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. आंबेकर यांची संशयिताशी २०२२ मध्ये भेट झाली होती. या भेटीत संशयिताने प्राप्तीकर विभागात ओळखी असल्याचे भासवले.
आंबेकर यांचा मुलगा प्रतिक आंबेकर याला प्राप्तीकर विभागात थेट सहायक प्राप्तीकर अधिकारी पदावर नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी आठ लाख रुपये आणि ऑनलाईन असे १५ लाख ५१ हजार रुपये संशयिताला देण्यात आली. २०२३ मध्ये संशयिताने टपालाने नियुक्तीचे पत्र पाठविले. मात्र ते बनावट होते. संशयिताने वरिल पदावर नेमणुकीसाठी पुन्हा दीड लाख रुपये उकळले. तीन वर्ष उलटूनही नोकरी मिळाली नाही. संशयिताने पैसैही परत केले नाही. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरकोळ वादातून मुलावर हल्ला
वडनेर गेट येथील केंद्रीय विद्यालय परिसरात किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलावर टोळक्याने हल्ला केला. याबाबत अनिल गायकवाड (मुरलीधरनगर, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दिली. हितेन बेद (जयभवानी रोड) आणि त्याचे १० साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गायकवाड यांचा मुलगा नरेश याचा संशयिताशी किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयितांनी हा हल्ला केला. बुधवारी दुपारी टोळक्याने नरेशला वडनेर गेट येथील केंद्रीय विद्यालयासमोर मारहाण केली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.