नाशिक – डिजिटल ॲरेस्ट दाखवून ऑनलाईन फसवणुकीत तक्रारदाराची काही रक्कम गेली. परंतु, तीन लाख २२ हजार रुपये तक्रारदारास मिळवून देण्यात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांना यश आले.
सूरज काळे (रा. टाकळी विंचुर) यांच्याशी संशयितांनी संपर्क करुन फिडेक्स ब्रॅंच जिल्हा अंधेरी येथून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावे एक पार्सल प्राप्त झाले असून त्यामध्ये बेकायदेशीर सामान पाठविण्यात आले आहे. त्यात चार इराणी पारपत्र आणि अमली पदार्थ आले असल्याचे त्याने सांगितले. स्काईप या ॲपव्दारे पत्र दाखवून पडताळणीसाठी पोलीस गणवेशात व्हिडिओ संभाषण केले.
डिजिटल ॲरेस्टची धमकी देत तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती प्राप्त करुन त्यांच्या बँक खात्यातून १० लाख रुपयांचे व्यक्तीगत कर्ज मंजुर केले. पुढे संशयितांनी आरटीजीएसद्वारे त्यांच्या खात्यात ते वळवून तक्रारदाराची फसवणूक केली.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, निरीक्षक नागेश मोहिते, हवालदार सुवर्णा आहिरे यांनी तक्रारीची दखल घेत बँकेशी पत्रव्यवहार करुन तक्रारदाराचे खाते गोठवले. त्यावर शिल्लक असलेले तीन लाख २२ हजार रुपये तक्रारदार काळे यांना न्यायालयाच्या आदेशाने परत मिळवून दिले.
नागरिकांनी कुठल्याही भूलथापा, धमकीला बळी पडू नये. डिजिजीटल ॲरेस्ट असा प्रकार नसतो. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. आपल्या नावे पार्सल आले, आर्थिक गैरव्यवहार, अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये. आपली बँक माहिती कोणालाही देवू नये. सायबर माध्यमातून फसवणूक झाल्यास जवळील पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राईम.गव्ह.इन या संकेतस्थळावर किंवा १९३० या मदतवाहिनीवर तसेच १९४५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले.