नाशिक – नाशिक ते पेठ महामार्गावर सावळा घाटात चालत्या वाहनांवर चढून माल लुटणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद करण्यात दिंडोरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
काही दिवसांपासून नाशिक-पेठ महामार्गावरील सावळा घाटात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर चढून मालाची लूट करण्याचे प्रकार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका मालवाहू वाहनावर चढून मागील ताडपत्री कापून साबणाचे पाच खोके चोरण्यात आले होते. याविषयी दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावळा घाटात याआधीही लुटमारीचे प्रकार झाले आहेत.
दीड ते दोन वर्षापासून चालत्या वाहनातून माल चोरीच्या घटना वाढल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने सातत्याने सावळा घाटात पाळत ठेवली. सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी यामागे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने दिंडोरी पोलीस ठाण्याच्या तपासी पथकाने सुरगाणा, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातून रवींद्र दळवी (२५), माधव शेखरे (३०), लालु पवार (२६), गणेश कडाळे (३२), आनंदा पवार (२२) सर्व राहणार सुरगाणा यांच्यासह दिनेश गवारे (२५, रा. करंजाळी), चेतन चारोस्कर (२५, रा. निफाड) आणि संजय बेंडकोळी (३०, रा. लखमापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
संशयितांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयित हे निफाड तसेच दिंडोरी तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे कामास असून दिवसभर शेतात काम करून रात्रीच्या सुमारास एकत्र येत असत. नाशिक-पेठ महामार्गावरील सावळा घाटात वाहनांचा वेग घाटामुळे कमी होताच काही जण प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसवर चढून बॅगा तसेच मालवाहु गाडीवर पाठीमागून चढत ताडपत्री कापून वाहनातील सामान खाली फेकून द्यायचे.
इतर साथीदार फेकलेले सामान जमा करुन जंगलात पळून जायचे. संशयितांकडून गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल तसेच गुन्हा करतांना वापरलेले वाहन, मोटार सायकल जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले. अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
लुटमारीची न्यारी पध्दत
सुरगाणा, निफाडसह अन्य भागात राहणारे युवक हे शेतकऱ्यांकडे शेतात काम करत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर दिंडोरी तालुक्यातील जंगल परिसरानजीक असलेल्या सावळा घाटात ते सर्व जमा होत. घाटात चढामुळे वाहनांचा वेग कमी होत असल्याने वाहनांवर चढून लुटमार करीत असत.