नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून नाशिक जिल्हा न्यायालयाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचा हुकूम (समन्स) दिला आहे. दोन वर्षांपूर्वी हिंगोली येथील जाहीर सभेत राहुल गांधी यांनी ही विधाने केल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. सावरकर यांच्या विचारावर काम करणाऱ्या निर्भय फाउंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी या संदर्भात जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला असून यात आक्षेपार्ह विधाने करून सामाजिक सलोख्याला धोका निर्माण करण्याचे कलमही प्रथमच समाविष्ट झाल्याची माहिती ॲड. मनोज पिंगळे यांनी दिली.

हेही वाचा : फुले दाम्पत्याच्या स्मारकातील शिलालेखात त्रुटी, ओळींमधून ‘शुद्र’ गायब

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी यांनी खोटी विधाने करुन सावरकर यांचा अवमान केला. गांधी यांच्या वक्तव्यात कुठलेही तथ्य नाही. त्यांनी सावरकरांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी जोडला. तेव्हा भाजप हा राजकीय पक्ष अस्तित्वात नव्हता, असे विविध मुद्दे याचिकेत मांडण्यात आले. गांधींनी केलेली विधाने प्रथमदर्शनी मानहानीकारक असून हा खटला चालवण्यासाठी पुरेशी असल्याचे न्यायालयाने म्हटल्याचे ॲड. पिंगळे यांनी माध्यमांना सांगितले.