नाशिक – सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी रात्री पुन्हा भूकंपाचे सौम्य हादरे बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. अनेकांनी रात्र जागून काढल्याचे सांगितले जाते. नाशिकपासून ६३ किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के बसले. त्याची तीव्रता २.१ रिश्टर स्केल असल्याची माहिती महाराष्ट अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) भूकंप मापन केंद्राने दिली.

जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील ३० भूकंप वेधशाळांपैकी २८ वेधशाळा बंद आहेत. नाशिक आणि इसापूर (उर्ध्व पैनगंगा) या दोन वेधशाळा कार्यान्वित असल्याने या भूकंपाचा केंद्रबिंदू मिळणे अवघड असल्याचे सांगितले जाते.

जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट व परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागासह सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात भूगर्भात काही हालचाली जाणवतात, असे स्थानिकांकडून सांगण्यात येते. पंधरवड्यापूर्वी सुरगाणा तालुक्यातील शिंदे गावात भूकंपाचे धक्के जाणवले होते. जमिनीतून आवाज आल्याचे ग्रामस्थांनी म्हटले होते.

तेव्हा मेरीच्या केंद्रात कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांत सुरगाणा तालुक्यात पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली. गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नागशेवडी, वांझुळपाडा, मोहपाडा, चिराई या गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. ही बाब येताच ग्रामस्थांनी घराबाहेर, मोकळ्या जागेत धाव घेतली. परस्परांकडून खातरजमा केली. या संदर्भातील माहिती नागशेवडी येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतून खातरजमा केली असता सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे धक्के बसल्याचे स्पष्ट झाले.

मेरीतील भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार गुरुवारी रात्री नऊ वाजून १५ मिनिटांनी भूक्कपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. नाशिक शहरापासून ६३ किलोमीटर अंतरावर हे धक्के बसले. त्याची तीव्रता २.१ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे. साधारणत १५ दिवसांपूर्वी सुरगाणा तालुक्यातील शिंदे गावासह आसपासच्या सहा ते सात किलोमीटरच्या परिघात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

जमिनीतून आवाज येत असल्याचे शिंदे गावच्या सरपंचांनी तहसील कार्यालयास कळविले होते. सुरगाणा हा गुजरातलगतचा आदिवासी तालुका आहे. सुरगाणा, कळवण तालुक्यातील दळवण तसेच पेठ या आदिवासी भागात मागील काही वर्षात अधुनमधून भूगर्भात घडामोडी जाणवत असल्याचे सांगितले जाते. काही वर्षांपूर्वी पुनद धरणावर वेधशाळा उभारण्यात आली. परंतु, तिथे भूकंपमापन यंत्रणा बसविली गेली नाही.

नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, तरी त्याचा केंद्रबिंदू मिळणे अवघ आहे. कारण, भूकंपाचा केंद्रबिंदू शोधण्यासाठी धक्क्यांची तीन केंद्रांवर नोंद होणे गरजेचे असते. सद्यस्थितीत जलसंपदा विभागाच्या राज्यातील ३० भूकंप वेधशाळांपैकी २८ वेधशाळा बंद आहेत. नाशिक आणि इसापूर (उर्ध्व पैनगंगा) येथील भूकंपमापन यंत्रे सुस्थितीत आहेत.

जलसंपदा विभागाव्यतिरिक्त केंद्र सरकारची राष्ट्रीय भूकंप विज्ञान संस्था मुंबई, पुणे, कराड, लातूर, नागपूर, अकोला येथे स्थापलेल्या सहा यंत्रात स्थानिक भूकंपाची नोंद घेते. त्यांच्यामार्फत तीन रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेच्या, स्थानिक भूकंप धक्क्यांची नोंद घेतली जात नसल्याचे जाणकार सांगतात. परंतु, देशातील भूकंपाच्या अनुषंगाने अद्ययावत माहिती भूकंप विज्ञान संस्थेच्या संकेतस्थळावर तात्काळ उपलब्ध होत असल्याचे धरण सुरक्षितता संघटनेचे म्हणणे आहे.