Ganesh Visarjan 2025: नाशिक – सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसात नाशिकमध्ये सकाळच्या नियोजित १० वाजेच्या वेळेपेक्षा उशिराने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला दिमाखात प्रारंभ झाला. मिरवणुकीतील क्रमांक चिठ्ठी पध्दतीने ठरविण्याच्या मागणीसाठी अडून बसलेल्या सहा मंडळांनी विसर्जन मिरवणूकीच्या एक दिवस आधी माघार घेतल्याने मिरवणुकीत २३ ते २५ मंडळांनी सहभाग घेतला.

वाकडी बारव येथून परंपरेनुसार नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष समीर शेटे, माजी आमदार वसंत गिते, शिवसेवा मंडळाचे प्रमुख विनायक पांडे, संजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी महापालिकेचा मानाचा गणपती होता. दरवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण असलेल्या गुलालवाडी व्यायामशाळेतील लेझिम पथकातील सदस्यांची संख्या यावेळी अंतर्गत वादामुळे कमी झाल्याचे दिसले.

रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा चांदीचा गणेश रथात स्थानापन्न झाला होता. शिवसेवा मंडळाची भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ढोल पथकांचा निनाद आणि त्यात घोषणांची पडणारी भर मिरवणुकीचा दिमाख वाढवत होते. भर पावसातही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मिरवणुकीत विद्युत रोषणाईचे देखावे असलेले चित्ररथही सामील आहेत.

सायंकाळी रोषणाईमुळे या चित्ररथांची शोभा अधिक वाढेल. काही मंडळांनी पोलिसांनी सूचना दिलेली असतानाही एकाऐवजी दोन ढोल पथकांचा समावेश केल्याचे दिसून आले. मिरवणुकीचा समारोप मध्यरात्री १२ वाजेपर्यंत करण्याचे प्रशासनाचे नियोजन असले तरी मिरवणूक नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरु झाल्याने तसेच संततधार पावसामुळे मिरवणुकीचा समारोपही लांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गंगापूर धरणातून करण्यात आलेला विसर्ग आणि सकाळपासून सुरु असलेला पाऊस यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून गोदावरीत मूर्ती विसर्जन करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांच्या वतीने मिरवणूक मार्गावर ८० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनव्दारे नजर ठेवण्यात येत आहे.. मिरवणूक अधिक रेंगाळू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे.

याशिवाय मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने निर्माल्य संकलन, मूर्ती संकलन सेवा देण्यास सकाळपासून सुरुवात करण्यात आली. याशिवाय महानगरपालिकेच्या वतीने विविध ठिकाणी कृत्रिम हौद तयार करत विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळी १० वाजेपासून घरोघरच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनास सुरुवात झाली. पाऊस असला तरी भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे.