नाशिक – दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर ५० दिवसांनी बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. वनारवाडी येथील चव्हाण वस्तीवर एक नर बिबट्या महिन्यापासून फिरत होता. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला. परंतु, बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. अखेर शनिवारी बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

परिसरात बिबट्याची संख्या अधिक असल्याने सर्वांनी शेती कामे करताना सजग राहावे, असे आवाहन वनविभागाचे अधिकारी अशोक काळे यांनी केले. वनारवाडी, दिंडोरी, मडकेजाम, हातनोरे, निळवंडी परिसरात बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्न वरिष्ठांच्या निर्देशांनुसार सुरु राहणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

सप्तशृंगी गडावर बिबट्या मृतावस्थेत

शुक्रवारी सप्तशृंगी गडावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. गडावर सध्या बिबट्याचा वावर दिसून येत असून काही ग्रामस्थांना गडावरील रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी वनविभागात नेले. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकलेले नाही.