नाशिक: मनपाचे वादग्रस्त, निलंबित शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांच्या कार्यकाळात राज्यातील विविध भागातील ५२ शिक्षकांना मनपा शाळेत समायोजित करताना अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितांना घरी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मूळ सेेवेतून संबंधित शिक्षक आधीच कार्यमुक्त झाले होते. आता महापालिकेने त्यांना कार्यमुक्त केल्याने संबंधितांची कोंडी होणार आहे.
महापालिका शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर काही महिन्यांपूर्वी विधीमंडळ अधिवेशनात चर्चा होऊन वादग्रस्त शिक्षणाधिकारी पाटील यांची उचलबांगडी झाली होती. त्यांच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी झाली. यात परजिल्ह्यातील आणि काही स्थानिक अशा ५२ शिक्षकांना मनपात समायोजित करण्यात अनियमितता झाल्याचे उघड झाले. यासह अनेक नियमबाह्य बाबींवरून शासनाने पाटील यांना अलीकडेच निलंबित केले.
पाटील यांनी मनपा शाळेत २७ पदे रिक्त असताना ३७ पदे इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सेवा वर्ग करून सामावून घेतली. ही रिक्त पदे पवित्र प्रणालीत नोंदविण्याची कारवाई केली नाही. याऐवजी रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरती करण्याची आवश्यकता नसल्याचे कळवून प्रशासनाची दिशाभूल केली. ५२ शिक्षकांना समायोजित करताना मोठा आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आदी जिल्ह्यातील हे शिक्षक आहेत. गरज नसताना त्यांना समायोजित करून महापालिकेवर मोठा आर्थिक भार टाकला गेल्याचे उघड झाले. या ५२ शिक्षकांना महापालिकेने घरी पाठविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.