नंदुरबार – सध्या महाराष्ट्रात आरक्षण हा विषय चांगलाच गाजत आहे. प्रत्येक समाज आरक्षणासाठी अडून बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक समाज इतरांनी आपल्या आरक्षणात शिरकाव करु नये, यासाठी दक्ष आहेत. बंजारा आणि धनगर समाज आदिवासी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करीत आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे माजी मंत्री ॲड. पदमाकर वळवी यांनी सदावर्ते यांना लक्ष्य केले आहे.

गुणरत्न सदावर्ते हा राज्याचा मुख्यमंत्री, न्यायाधीश आहे का, असा प्रश्न करीत पदमाकर वळवी यांनी राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली भांडणे भाजप सरकारचे अपयश असून मुख्यमंत्री फडणवीस यांनीच गुणरत्न सदावर्ते आणि काही तज्ज्ञ लोकांना यासाठी सोडल्याचा आरोप केला आहे. सत्तेतील आदिवासी आमदार, खासदारांनी केंद्र आणि राज्य सरकारला आपली भूमिका विचारली पाहिजे, असे म्हणत आदिवासी आरक्षणावर राजकारण सुरू आहे. सध्या निवडणुका येणार आहेत. त्यामुळे हे सर्व विषय बाहेर येत असल्याचा आरोप माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केला आहे.

सध्या बंजारा समाजाला हैदराबाद गँझेटनुसार आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्याबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची एक चित्रफित समाज माध्यमात पसरली आहे. याच अनुशंगाने पदमाकर वळवी यांनी सदावर्तेंवर टीका केली आहे. कायद्याने कोणत्याही समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करायचे असेल तर त्यासाठी काही तरतुदी आहेत की नाही, असा प्रश्न वळवी यांनी उपस्थित केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचे याबाबतचे कुठलेही निर्देश नाहीत.

एकीकडे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटनुसार लागू करण्यात येत असलेल्या आरक्षणाला सदावर्ते विरोध करत आहे. दुसरीकडे हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासींमधून आरक्षणासाठी पाठिंबा देत असल्याची त्यांची दुटप्पी भुमिका आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी असल्याचा कोणताही पुरावा नाही. गुणरत्न सदावर्तेंनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे, असा सल्ला पदमाकर वळवींनी दिला आहे.

सदावर्ते काँग्रेसवर टीका करत आहेत. मात्र काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. एवढेच नव्हे, तर सर्वांना आरक्षण देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसने कधी भानगडी लावल्या नाहीत. सध्या राज्यात आरक्षणावरुन सुरू असलेली भांडणे भाजप सरकारचे अपयश असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गुणरत्न सदावर्ते आणि काही लोकांना यासाठी सोडल्याचा आरोप पदमाकर वळवींनी केला आहे. वळवी हे स्वत: वकील असुन त्यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरुन उच्च आण सर्वोच्च न्यायालयात लढा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कॉग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले पदमाकर वळवी आता पुन्हा काँग्रेसमध्ये सक्रीय झाले असून आरक्षणाच्या मुद्यावरुन ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.