नाशिक – शहर पोलिसांनी राजकीय गुन्हेगारांविरुध्द मोहीम सुरु केल्यानंतर निद्रिस्त महापालिका प्रशासनाला नाईलाजाने का होईना शहरात सर्वत्र बोकाळलेल्या अनधिकृत फलकबाजीविरुध्द कारवाई करणे भाग पडले. ही कारवाई करताना महापालिका प्रशासनाची निष्क्रिय कारभाराची लक्तरेही उघडी होत आहेत.
शहरात जागा मिळेल तिथे फलक लावले जातात. सिग्नल, दुभाजक, वाहतूक बेट, दिशादर्शक कमानी यापैकी काहीही सुटलेले नाही. याविरोधात अनेकवेळा ओरड करुनही डोळ्यांवर झापडे बांधलेल्या महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याची तसदी घेतली नाही.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी राजकीय गुन्हेगारांविरुध्द अचानक मोहीम तीव्र केल्यानंतर आणि अवैध फलकबाजीतून राजकीय गुन्हेगार आपली छबी मिरवत असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी असे फलक उभारणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे महापालिकेलाही जाग आली. त्यांनीही असे अवैध फलक हटविण्यास सुरुवात केली. परंतु, हे करताना पालिका प्रशासनाचा सुस्त कारभारही उघड्यावर येऊ लागला. त्याचे एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणून त्र्यंबक नाक्यावरील दिशादर्शक कमानींवरील फलकांविरोधातील कारवाईकडे पाहता येईल.
शहरातून जाणाऱ्या जुन्या आग्रारोडवरील त्र्यंबक नाका येथे पिनॅकल मॅाल आणि कॅथॅालिक चर्च यांच्यामधे दिशादर्शक कमान आहे. मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा दिशादर्शक फलक झाकोळणारे अवैध फलक काढण्यास सुरुवात झाली. गंमत म्हणजे, कमानीवरील एक फलक काढल्यावर त्याच्याखाली दुसरा फलक, तो काढल्यावर तिसरा आणि तो काढल्यावर चौथा असे चार फलक आढळून आले. याचाच अर्थ कित्येक महिन्यांपासून ही दिशादर्शक कमान अवैध फलकांनी झाकोळली होती.
महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह प्रशासनाचे कित्येक बडे अधिकारी या कालावधीत या रस्त्याने गेले असतील. त्यांना महापालिकेनेच उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर झालेले असे अतिक्रमण इतके दिवस दिसले नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.
असे अवैध फलक लावणाऱ्यावर आणि त्याकडे कानाडोळा करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यावर (नाव आणि त्यांच्या अधिकारपदासह) नेमकी काय कार्यवाही झाली, कोणाला किती दंड झाला, फलक काढण्यासाठी प्रत्यक्ष (यंत्रणा, वाहने, कर्मचारी, अधिकारी, पोलीस संरक्षण) आणि अप्रत्यक्ष म्हणजे किती तास वाहतूक खोळंबा झाला, नाशिककरांना झालेला मनस्ताप, दिशा न समजल्यामुळे नाशिकला आलेल्या प्रवासी पाहुण्यांची झालेली गैरसोय, या सर्वांचा मूल्याधिष्टित खर्चाचा ताळेबंद काय, अशी सर्व माहिती प्रसिद्ध करण्याची गरज शहरातील ज्येष्ठ अभिनेते तथा उद्योजक सी. एल. कुलकर्णी यांनी मांडली आहे.