नाशिक – जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या नावाखाली बनावट शासन आदेश तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या विरोधात भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तत्कालीन कार्यकारी अभियंता नलावडे या बांधकाम विभागात कार्यरत असताना कार्यालयातील इतरांच्या मदतीने चार डिसेंबर २०२४ ते पाच फेब्रुवारी २०२५ या कालावधीत बनावट शासन निर्णय तयार करून त्याद्वारे एक काेटी रुपयांच्या पर्यटन स्थळ पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भासविले. बनावट शासन निर्णय बेकायदेशीरपणे शासकीय दस्तांवर नोंदवून खोटे दस्तावेज तयार केले. त्याची निविदा प्रसिद्ध करून शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याची फिर्याद कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदिप अहिरे यांनी बुधवारी रात्री भद्रकाली पोलिसात दाखल केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाेलिसांनी नलावडे यांच्या विराेधात फसवणूक व बनावट दस्तावेज तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, यापुढेही जिल्हा परिषदेत शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिला.