नाशिक : दिवाळी संपल्याने पुन्हा आपआपल्या कामाच्या ठिकाणी नोकरदार, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी परतू लागल्याने नाशिक शहरातून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस गर्दीने फुल्ल भरुन जात आहेत. साधारणपणे या महिनाअखेरपर्यंत ही स्थिती राहण्याची चिन्हे असून इ-शिवाई, शिवनेरी या बसेसचे आरक्षण त्वरीत पूर्ण होत आहे. त्यामुळे तत्परतेने जाणे गरजेचे असलेल्यांना साध्या बससेवेचा किंवा खासगी प्रवासी सेवेचा आधार घेणे भाग पडत आहे.

दिवाळीच्या सुट्या लागल्यावर मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमधून नोकरदार, कामगारवर्ग आपआपल्या गावी जाऊ लागतात. त्यामुळे पाच ते सहा दिवसांपूर्वी मुंबई, पुणे, नाशिक या शहरांकडून उत्तर महाराष्ट्रातील धुळे, सटाणा, मालेगाव, जळगाव, नंदुूरबार, साक्री या परिसराकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड होती. राज्य परिवहन महामंडळाने जादा बससेवेची सुविधा उपलब्ध करुन दिलेली असतानाही सर्व बसेस गर्दीने भरुन वाहत होत्या. नाशिकहून पुणे बससेवेला सर्वाधिक गर्दी असते. नाशिक-पुणे मार्गावर रोज ९० पेक्षा अधिक बसेस धावत असतात. या गर्दीत प्रामुख्याने कामगार आणि विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते.

नाशिकहून पुणे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काही वर्षांमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच पुणे येथे कामानिमित्त गेलेल्या कामगारवर्गाची संख्याही अधिक आहे. विद्यार्थीवर्ग महाविद्यालयांना शनिवार आणि रविवारी सुट्टी राहत असल्याने शुक्रवारी दुपारनंतर पुण्याहून नाशिककडे येणाऱ्या बसेसमध्ये तसेच शनिवार, रविवारची सुट्टी संपल्यानंतर नाशिकहून रविवारी पुण्याकडे जाणाऱ्या बसेसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. त्यातच दिवाळीच्या सुट्टींची भर पडल्याने वाढत्या प्रवासीसंख्येला वाहून नेण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला दिवाळीत जादा बससेवा सुरु करणे भाग पडले.

आता प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता औद्योगिक क्षेत्र आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दिवाळी सुट्ट्या संपल्या आहेत. त्यामुळे ही मंडळी पुन्हा पुण्याकडे परतू लागली आहेत. दिवाळीनंतर बसेसला गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरुन अनेकांनी आगाऊ रिझर्व्हेशन करुन ठेवण्याचा योग्य निर्णय घेतला. त्यातही इ-शिवाई, शिवनेरी या गाड्यांना रिझर्व्हेशनसाठी प्राधान्य देण्यात येत असल्याने २८ ऑक्टोबरपर्यंतच्या इ-शिवाई गाड्यांचे नाशिकहून रिझर्व्हेशन पूर्ण झाल्याची माहिती देण्याक येत आहे. शनिवार आणि रविवारी प्रवाशांच्या संख्येत अधिक वाढ होऊ शकते. पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिक प्रमाणावर बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुण्याला जाण्यासाठी आरक्षण अधिक प्रमाणावर असल्याने प्रवाशांनी मिळेल त्या बसने पुण्याकडे प्रस्थान करावे, अशी सूचना शुक्रवारी नाशिक येथील स्थानकात देण्यात येत होती.