नाशिक – शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे एक ते १५ जुलै या कालावधीत विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ मंगळवारी नाशिकरोड, श्रमिक नगर, जेल रोड येथे विभागीय शिक्षण उपसंचालक संजयकुमार राठोड यांच्या उपस्थितीत आणि प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते १४ वयोगटातील कोणतेही मूल शाळाबाह्य राहू नये, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान, काही स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांमध्ये शाळाबाह्य मुले आणि मुली आढळून आल्या. संबंधित पालकांशी संवाद साधून त्यांना शाळेच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यात आले.
मुलांची नोंद घेऊन त्यांना लवकरात लवकर शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया राबविण्याचे आश्वासन दिले गेले. या मोहिमेअंतर्गत शाळा क्रमांक ५६, जेलटाकी परिसरातील कॅनॉल रोड, झोपडपट्टी, इंदिरानगर, श्रमिकनगर, भगवा चौक, ट्रॅक्शन रोड या भागात प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले.
शिक्षकांनी शोधून काढलेल्या शाळाबाह्य मुलांचे फुल देऊन राठोड यांनी स्वागत केले. यावेळी पालकांशी संवाद साधताना त्यांनी, कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, असे सांगितले. प्रशासनाधिकारी डॉ. मिता चौधरी यांनी मोहिमेत आढळलेल्या शाळाबाह्य मुलांचा गौरव करत महिला पालकांशी संवाद साधला.
मुलांना नियमितपणे शाळेत पाठविण्याचे आवाहन केले. मोहिमेदरम्यान शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, पर्यवेक्षक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांनी श्रमिक वस्तीमध्ये जाऊन घरोघरी सर्वेक्षण केले. या प्रयत्नातून दोन मुलगे आणि एक मुलगी शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. त्यांची नोंद घेऊन त्यांना साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्रमांक ५६ येथे तत्काळ दाखल करण्यात आले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींनी शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये जागृती घडविण्यासाठी वाद्य संगीत, गीत सादरीकरण आणि पथनाटिका सादर केली. या उपक्रमात मुख्याध्यापक, पर्यवेक्षक वसंत विसपुते, विशेषतज्ज्ञ प्रल्हाद हंकारे, शिक्षक किसन अहिरे, सुनील कुमार मगर, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.