नाशिक – महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांसह आजी-माजी नगरसेवक गणेशोत्सव माध्यमातून सक्रिय झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे.महापालिका पातळीवर ही संख्या ५०६ तर, पोलीस आयुक्तालयाच्या दप्तरी ८६७ इतकी आहे. गणरायाच्या आगमनापर्यंत महापालिका तसेच पोलीस आयुक्तालयाच्या वतीने परवानगी नाट्य सुरू राहिले.
पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी भागातून पोलीस ठाणेनिहाय सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले होते. शहरातील ८७६ हून अधिक गणेश मंडळाना पोलीस आयुक्तालयाने अटी-शर्तींच्या अधीन परवानगी दिली. सार्वजनिक गणेश मंडळांचे शहरातील देखावे पाहण्यासाठी अजून दोन ते तीन दिवसात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर वाहतूक कोंडी न होण्यासाठी मंडळांनी स्वयंशिस्त पाळण्याचे पोलिसांनी सूचित केले आहे. त्यानुसार मंडळांनीही वाहतूक नियोजनासाठी तयारी पूर्ण केली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील वाहतूक विस्कळीत न होण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने नियोजन केले आहे. वाहतूक विभागाच्या चारही पथकांना त्यासंदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य शहरासह उपनगरांत काही मंडळांचे मंडप हे रस्त्यालगत असल्याने तिथे भाविकांच्या वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडळांनी मंडपाशेजारील वाहतूक नियमनाची कार्यवाही करावी, त्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात यावेत. वाहतुकीची स्वयंशिस्त पाळल्यास उत्सव जल्लोषात साजरा होईल, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.
कोणत्याही मंडळांत आवाजाच्या भिंतींचा (डीजे) वापर होणार नसल्याने आवाजाची मर्यादा पाळण्याचे बंधन पाळावे लागणार आहे. त्यानुसार महापालिका व पोलिसांनी हमीपत्र मंडळांकडून घेतले आहे. त्यामध्ये मंडपामुळे रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही. मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन मंडपात चेंगराचेंगरी होणार नाही. मंडपाच्या दोन्ही बाजूने सुरक्षेसाठी दोरखंड किंवा सुरक्षित व्यवस्था उभारण्यात येईल. भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र जागेचे नियोजन केले जाईल. कोणत्याही प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. याची दक्षता मंडळ घेईल, असे नमूद आहे. या हमीपत्रावर मंडळाच्या अध्यक्षाची स्वाक्षरी झाल्यानंतर परवानगी देण्यात आली.
दुसरीकडे, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विभागनिहाय गणेश मंडळांना परवानग्या देण्यात आल्या. महापालिका प्रशासनाकडे ५०६ सार्वजनिक गणेश मंडळांनी अर्ज केले. सातपूरमध्ये ही संख्या सर्वाधिक म्हणजे १४६ इतकी तर नाशिक पूर्वमध्ये कमी म्हणजे ४३ इतकी आहे. नाशिकरोड विभागातून ६४, नाशिक पूर्व ४३, नाशिक पश्चिम ६०, पंचवटी ११९, नवीन नाशिक ७४ तर सातपूरमध्ये १४६ मंडळांची नोंदणी झाली आहे.