नाशिक – ब्रह्मगिरी पर्वतास श्रावणात शिवभक्तांकडून प्रदक्षिणा केली जाते. विशेषत: श्रावणातील तिसऱ्या सोमवारी ही गर्दी उच्चांक गाठते. यंदाही गर्दीचा महापूर त्र्यंबकवासियांसह प्रशासनाने अनुभवला. रविवारी रिमझिम पावसात तर सोमवारी ऊन-पावसाच्या खेळात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली. भाविकांच्या गर्दीमुळे यात्री निवास हाऊसफुल्ल झाल्याने बाहेरगावहून आलेल्या भाविकांना राहण्यासाठी अडचणी आल्या. दोन लाखांहून अधिक भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरात ५० लाखांहून अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.
श्रावणात शिवभक्तीस विशेष महत्व असते. या काळात बारा ज्योतिर्लिंगापैंकी एक असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यास भाविकांची त्र्यंबकेश्वर येथे गर्दी होते. रविवारी रात्रीच भाविकांनी कुशावर्त कुंडावर स्नान करत ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी मार्गक्रमण करण्यास सुरूवात केली होती. या वेळी हलकाचा पाऊस सुरू होता. सोमवारी रिमझिम पाऊस सुरू असतांना भाविकांनी श्रावणातील तिसरी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणा मार्गावर भाविकांसाठी चहा, कॉफी, उपवासाचे खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आली होती. मार्गावर लहान मोठ्यांसह तरूणाईंनी गर्दी केली. बम बम भोलेचा गजर करत शिवभक्तांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. या काळात देवस्थान परिसरात काही अंशी दर्शनासाठी गर्दी कमी होती. परिसरातील गौतम ऋषी मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने प्रदक्षिणा मार्गावरील लोकांना उशीर झाला.
देवस्थानच्या वतीने जिल्हा न्यायाधीश संजय भन्साळी, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते रुद्रपूजन आणि महापूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणारी गर्दी लक्षात घेता व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले होते. गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने देवस्थानचे नियोजन काही अंशी कोलमडले. सायंकाळी देवस्थानच्या वतीने श्रींच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक काढण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता.
प्रशासनाकडून खासगी वाहनांना त्र्यंबकेश्वर शहर परिसरात येण्यास प्रवेश बंदी करण्यात आली होती. खासगी वाहनांना खंबाळे परिसरात थांबविण्यात आले. त्या ठिकाणाहून सिटी लिंकच्या ५० तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या २०० हून अधिक बस या भाविकांची ने-आण करत होत्या. दुसरीकडे ग्रामीण भागातील वाहनधारकांच्या बेशिस्त वाहनतळामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा प्रमुख मार्ग असलेल्या गणपतबारी परिसरात ग्रामीण भागातील वाहनचालकांनी रस्त्यावर वाहने लावल्याने वाहतूक खोळंबा झाला. पिंपळद, ब्राह्मणवाडे, माळेगाव या गावांकडे जाणाऱ्या लोकांची अडचण झाली.
त्र्यंबकेश्वरातील व्यवसायांना चालना
त्र्यंबकेश्वर येथे शिवलिंगाचे दर्शन यासह पूजा विधीसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर काहींना मुक्काम करण्यासाठी यात्री निवासमध्ये जागा नसल्याने मिळेल त्या मोकळ्या ठिकाणी, ओट्यावर भाविकांनी ठिय्या दिला. या कालावधीत त्र्यंबक परिसरात ठिकठिकाणी उपवासाचे खाद्यपदार्थ, चहा, कॉफी, पूजेचे सामान, प्रसाद यासह अन्य लहान मोठी दुकाने लागली होती. भाविकांनी दर्शनानंतर अल्पोहारासह काहींनी दुपारनंतर जेवणाचा आनंद घेतला.