नाशिक – जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बालकांवर अत्याचार प्रकरणी चार जणांना कारावास ठोठावण्यात आला.
पहिली घटना निफाड तालुक्यातील आहे. प्रमिला पाटील, रत्ना कोळी, सुरेखा भिल्ल (रा. ओझर) यांनी साथीदाराच्या मदतीने अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेले होते. तिचे बळजबरीने लग्न लावुन दिले. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आरोपींविरुध्द निफाड सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीत आरोप सिध्द झाल्याने न्यायालयाने तीनही आरोपींना पाच वर्षे साधी कैद आणि प्रत्येकाला तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
ओझर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक रहाटे यांनी तपास केला होता. या खटल्यात सरकारी अभियोक्ता आर. एल. कापसे यांनी तसेच पैरवी अधिकारी म्हणून हवालदार बागूल यांनी काम पाहिले. गुन्हे दोषसिध्दी विभाग नाशिक येथील सहायक निरीक्षक श्रीकांत पाटील, उपनिरीक्षक माधुरी कंखरे, महिला पोलीस अंमलदार भांगे आदींनी पाठपुरावा केला.
दुसऱ्या घटनेत येवला तालुक्यातील राजापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. योगेश घुगे (२३, रा. राजापूर) याने अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेले होते. पीडितेच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास मनमाड उपविभागाचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी शेख यांनी केला होता. सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असता सरकारी अभियोक्ता सरोदे यांनी तसेच पैरवी अधिकारी म्हणून हवालदार पवार यांनी काम पाहिले. येवला अतिरिक्त सत्र न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. योगेश घुगे याला २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
