जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रवादीला (शरद पवार) मोठी गळती लागली असताना, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, गुजराथी यांनी आपण कुठेही जात नसून राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात, धुळ्यात शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहुन त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
गुजराथी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीपासून शरद पवार यांना दिलेली साथ आजतागायत कायम होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही गुजराथी हे पवार यांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले. पक्षाच्या जळगावमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गरज पडली तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केले. पवार यांच्यावर विरोधकांकडून आरोप होत असतानाही गुजराथी यांनी त्यांच्यावरील आरोपांचे आपल्या स्तरावर खंडन करण्याची भूमिका घेतली. असे असताना, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वी जळगावात पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीला ते अनुपस्थित राहिले. एरवी नेहमी व्यासपीठावरील पहिल्या रांगेत बसणारे गुजराथी असे अचानक पक्षाच्या बैठकीपासून लांब राहिल्याने बैठकीला उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे आणि अरूण पाटील यांनी पक्ष सोडल्याने आधीच शरद पवार गट खिळखिळा झाला आहे. त्यामुळे गुजराथी यांनी साथ सोडल्यास शरद पवार गटासाठी तो आतपर्यंतचा सर्वात मोठा धक्का असेल, असे बोलले गेले. परंतु, शरद पवार यांनी आजपर्यंत आपल्याला भरपूर काही दिले. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा अन्य दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, आता मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कोणत्याही पक्षात गेले तरी मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहील, असे स्पष्ट करून गुजराथी यांनी त्यांच्या शरद पवार गट सोडून जाण्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यावेळी केला.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस शनिवारी धुळे दौऱ्यावर आले असता अरूण गुजराथी हे देखील तिथे आवर्जून उपस्थित राहिले. इतकेच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी हस्तांदोलन करून दोन शब्द हितगूज केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांनी त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य खात्याचे मंत्री आणि भाजपच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असल्याने रोहिदास पाटील यांचा प्रथम स्मृतिदिन राजकीय पटलावर चर्चेचा विषय ठरला. अभिवादन आणि पुरस्कार प्रदान सोहळा असा हा कार्यक्रम असला, तरी रोहिदास पाटील यांचे पुत्र माजी आमदार कुणाल पाटील यांच्या राजकीय भविष्यासाठी त्याचे महत्व अधिक असल्याचे अधोरेखित झाले.