scorecardresearch

उड्डाणपुलासाठीच्या वृक्षतोडीविरोधात हरकतींचा पाऊस

विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या त्र्यंबक रस्त्यावरील मायको चौक आणि उंटवाडी येथील उड्डाण पुलाच्या कामात विशाल वटवृक्षांसह तब्बल ५८० झाडे तोडली जाणार असल्याच्या विरोधात सरसावलेल्या पर्यावरणप्रेमींनी सुमारे अडीच हजार हरकती नोंदवत पाऊस पाडला आहे.

पुलाचे काम रखडण्याची चिन्हे

नाशिक: विविध कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या त्र्यंबक रस्त्यावरील मायको चौक आणि उंटवाडी येथील उड्डाण पुलाच्या कामात विशाल वटवृक्षांसह तब्बल ५८० झाडे तोडली जाणार असल्याच्या विरोधात सरसावलेल्या पर्यावरणप्रेमींनी सुमारे अडीच हजार हरकती नोंदवत पाऊस पाडला आहे. वृक्षतोडीला विरोध करणारे २१०० मेल आणि पावणेदोनशेहून अधिक लेखी स्वरुपात हरकती महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय १०० हून अधिक मेल पालिका आयुक्तांना पाठविले गेले आहेत. उड्डाण पुलाच्या प्रक्रियेतील अनियमिततेविरोधात दाखल याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. घाईघाईत उड्डाण पुलाच्या कामास चाल देण्याचे प्रयत्न उपरोक्त घटनाक्रमाने विफल झाले असून आता हे काम रखडण्याची चिन्हे दिसत आहेत. टवाडी उड्डाणपूल ते त्रिमूर्ती चौक तसेच कामटवाडे रस्त्यावरील माऊली लॉन्स या भागातील पुरातून वटवृक्षासह ५८८ झाडे तोडण्याची नोटीस बजावल्यानंतर पर्यावरणप्रेमी संघटना आणि महापालिका यांच्यात संघर्षांचा नवीन अध्याय सुरू झाला.

 मनपा विरोधात अवमान याचिका दाखल करणे, स्वाक्षरी मोहीम आणि जास्तीतजास्त हरकती नोंदविण्याची मोहीम राबविली गेली. वृक्षतोडीविषयी हरकती नोंदविण्यास सोमवार ही अखेरची मुदत होती. हरकती नोंदविल्या जाऊ नये म्हणून मनपाने झाडांवर नोटीसा विलंबाने लावल्याचा पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे. तीन दिवसांपूर्वी या नोटीस झाडांच्या बुंधावर लावल्या गेल्या. त्यानंतर पर्यावरणप्रेमी संघटना व स्थानिक नागरिकांनी एकवटून हरकती नोंदविण्याचा सपाटा लावला. अवघ्या तीन दिवसांत हजारो हरकती नोंदविल्या गेल्याचे उघड झाले आहे. उड्डाण पुलासह रस्त्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडी विरोधात तब्बल २१०० हरकतींचे मेल प्रशासनाला पाठविले गेले आहेत. इतकेच नव्हे तर १७५ हून अधिक हरकती लेखी स्वरुपात दिल्या गेल्या. पालिका आयुक्तांना १०० हून अधिक मेल आल्याचे सांगितले जाते. यामुळे उड्डाण पूल व झाडांच्या तोडीविरोधातील तीव्र असंतोष उघड झाला आहे. प्रत्येक झाडाबाबत महापालिकेला सुनावणी घेऊन काटेकोरपणे निर्णय घ्यावा लागेल. या प्रक्रियेस बराच कालावधी लागणार आहे. दरम्यान, उंटवाडी येथील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या मूळ प्राकलनातील अनियमिततेवरून भाजपच्या एका नगरसेवकाने न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी होणार आहे. महापालिकेला आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.

जीपीएस सर्वेक्षण होणार

उड्डाण पूल आणि रस्ते कामात शेकडो झाडे तोडण्यास पर्यावरणप्रेमी व नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन महापालिकेने प्रस्तावित कामात नेमकी किती झाडे तोडावी लागतील, याची स्पष्टता होण्यासाठी जीपीएस सर्वेक्षण करण्याचे निश्चित केले आहे. या माध्यमातून जास्तीतजास्त झाडे वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rain objections tree felling flyover ysh

ताज्या बातम्या