नाशिक – नाशिक लोकसभा मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत असतानाही अद्याप महायुतीत ही जागा कोणत्या पक्षासाठी सुटणार आणि कोण उमेदवार राहणार, हे प्रश्न कायम आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी नाशिक मतदारसंघातून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे तर, दिंडोरीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्करराव भगरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी फेरी काढून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीचे पडघम राजकीय पटलावर वाजत असताना नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या नियोजनासाठी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे गुरूवारी नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाची बैठक झाली. भव्य शक्तीप्रदर्शनाद्वारे आपली ताकद दाखवून देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. सोमवारी शिवसेना कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी फेरी काढण्याचा निर्णयही घेण्यात आला.

हेही वाचा >>> संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका

नाशिक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा होऊन महिना झाला आहे. प्रचाराच्या काही फेऱ्याही मविआ उमेदवारांकडून झाल्या आहेत. असे असतानाह नाशिकसाठी महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित नसल्याने महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. महायुतीतील तीनही पक्षांकडून रोज वेगवेगळी नावे उमेदवारीसाठी पुढे येत आहेत. परंतु, स्थानिक पातळीवर त्या नावांविषयी चर्चेशिवाय कोणत्याही हालचाली होत नसल्याने सर्वच संभ्रमित आहेत. राजाभाऊ वाजे यांच्या उमेदवारीचा विरोधकांनी किती धसका घेतला आहे, याचे हे मूर्तीमंत उदाहरण म्हणावे लागेल, असा टोला ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हाणला. सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते यांनी सोमवारी निघणारी फेरी महायुतीच्या उरात धडकी भरवणारी असेल, असा विश्वास व्यक्त करून फेरीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी संजय राऊत, जयंत पाटील यांची उपस्थिती सोमवारी महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा मतदारसंघातून राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी मतदारसंघातील भास्कर भगरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी खासदार संजय राऊत, जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच पुढील काळात दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार, आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, बानगुडे पाटील, सुषमा अंधारे आदींचे दौरे होणार आहेत.