नाशिक : राष्ट्रवादीचे (शरद पवार ) प्रमुख शरद पवार यांनी विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हावे, असे आवाहन करतानाच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, तेव्हाच हे शक्य होईल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडले.

गुरुवारी आठवले नाशिक दौऱ्यावर आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमात एकत्र आले होते. दोन्ही गट एकत्र आले तर बरे होईल. प्रत्येक पक्षाचा स्वतःचा कार्यक्रम आणि विचारसरणी असते. आमचीही स्वतःची विचारसरणी आहे. त्यामुळे भाजपविरोधात काही मुद्द्यांवर आमचे वेगवेगळे विचार आहेत. परंतु, आम्ही किमान समान कार्यक्रमावर आणि विकासाला सर्वोच्च प्राधान्य देऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे आठवले यांनी नमूद केले. शरद पवार यांनी विशिष्ट मुद्द्यांवर आघाडीत सामील व्हावे, अशी आमची तीव्र इच्छा आहे, असे आठवले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी हातमिळवणी केली तर चांगले होईल. जर शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्यास तयार असतील तरच हे होऊ शकते. जर ते एनडीएसोबत येत नसतील तर याचा अर्थ दोन्ही गट एकत्र येणार नाहीत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले. मनसेच्या गैर-महाराष्ट्रीयनांवर मराठी भाषा लादण्याच्या धोरणावरही आठवले यांनी टीका केली. मंडळ कुठलेही असो मराठी भाषा शिकवायला हवी. मुंबई हे महानगर आहे. देशभरातून लोक तेथे नोकरीसाठी येतात. मुंबईत जे लोक खूप काळापासून आहेत, ते मराठी बोलतात, जे उशीरा येतात, ते बोलत नाहीत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकांना मराठी बोलण्यास भाग पाडणे चुकीचे आहे, असे आठवले म्हणाले. जळगाव येथे झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी होणे गरजेचे आहे. अपघात होऊ नये याची रेल्वेमंत्र्यांनी दक्षता घ्यावी, असेही आठवले यांनी सांगितले.