जळगाव – हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाशी संबंध असल्याच्या आरोपावरून गिरीश महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी शनिवारी केली होती. त्यावरून महाजन यांना कोंडीत पकडण्यात खडसे यशस्वी झाल्याचे दिसूनही येत होते. मात्र, त्याच दिवशी मध्यरात्री त्यांच्या जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झाल्याने खडसे यांच्यावर आता खाली मान घालण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. मंत्री महाजन यांनीही खडसे यांच्यावर टीका करण्याची आयती संधी त्यामुळे साधली आहे.
हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास आपल्या सोयीनुसार करून ते दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा सनसनाटी आरोप आमदार खडसे यांनी जळगावात शनिवारी पत्रकार परिषदेत केला. कोणतेही प्रकरण असो त्यात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांचे नाव सर्वात आधी का येते, असाही प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला. हनी ट्रॅपमध्ये महाजन यांचा सहभाग आहे. यापूर्वीही एका पत्रकाराच्या चित्रफितीतून महाजन यांच्यावर एका उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याशी केलेल्या वादग्रस्त संभाषणाचे गंभीर आरोप झाले होते.
खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा सभागृहात महाजन यांच्या खासगी आयुष्यावर थेट खोचक टिप्पणी केली होती, असे बरेच संदर्भ देऊन खडसे यांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. तसेच अंमली पदार्थांसह गुटखा सर्वात जास्त चाळीसगावमध्येच का पकडला जातो, असाही टोला त्यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना लगावला होता.
खडसे यांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर भाजपकडून आता काय प्रतिक्रिया येते, त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रत्यक्षात, रविवारी सकाळी एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे शहरातील खराडी परिसरात एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आल्याची बातमी सर्वांच्या कानावर पडली. ती ऐकून जिल्ह्यात मोठी खळबळ आता उडाली आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी जावयावरील कारवाईचे निमित्त साधून खडसे यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
खडसे यांनी शनिवारी जळगावमधील पत्रकार परिषदेत चाळीसगाव शहरातच अंमली पदार्थ कसे काय पकडले जातात म्हणून आक्षेप घेतला होता. आता त्यांचे जावई स्वतः रेव्ह पार्टीसारखे सगळे उद्योग करत असल्याचे पोलीस कारवाईतून समोर आले आहे. हा सर्व विषय पोलीस तपासाचा आहे. तपासातून नेमके काय घडले ते समजणार आहे. पार्टीत अंमली पदार्थ, दारूच्या बाटल्या, हुक्का वगैरे सापडला. त्याठिकाणी काही महिलाही उपस्थित होत्या, अशी माहिती मिळाल्याचा दावा मंत्री महाजन पत्रकारांशी बोलताना केला.
खडसे यांना जर त्यांच्या जावयाला अडकविण्यात येणार असल्याचा आधीच संशय होता तर त्यांनी जावयाला सावध करायला पाहिजे होते, असाही टोला महाजन यांनी खडसे यांना हाणला. काही झाले की यांनी केले, त्यांनी केले आणि हे त्यांचे षडयंत्र आहे, असे बरेच आरोप खडसे विरोधकांवर नेहमीच करतात. त्यांचा जावई काही लहान नाही की त्याला कोणी तरी पार्टीमध्ये कडेवर उचलून घेऊन गेले, अशीही टीका महाजन यांनी केली.
पुण्यातील पार्टी ही रेव्ह होती की घरगुती, हे पोलीस तपासातून समोर येईल. तसेच पार्टीत अंमली पदार्थ होते की आणखी दुसरे काही, हे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट होईल. तोपर्यंत त्याविषयावर बोलणे योग्य वाटत नाही. – एकनाथ खडसे (आमदार- शरद पवार गट).
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.