नाशिक : सातपूर येथील हॉटेल गोळीबार प्रकरणी पोलीस कोठडीत असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी प्रकाश लोंढेची सोमवारी पोलीस कोठडी संपल्यावर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्यासह अन्य सहा आरोपींना १७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढविण्यात आली.
सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे फरार आहे. पोलिसांनी त्याचे वडील आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पदाधिकारी प्रकाश लोंढे, भूषणचा भाऊ दीपक लोंढे यांना सहआरोपी करत ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या गुन्हेगारांची दोनहून अधिक वेळा पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे. सोमवारी प्रकाश लोंढेसह अन्य सहा जणांची पोलीस कोठडी १७ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली.
यामध्ये प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे, शुभम गोसावी यांचा समावेश आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या सनी विठ्ठलकर याला स्थानिक गुन्हे शाखा अंबडने सोमवारी ताब्यात घेतले. लोंढे टोळीबरोबर सुरूवातीपासून असलेला विठ्ठलकर हा फरार होता.
तो उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी निघून गेला. नाशिक पोलीस त्याच्या मागावर होते. नाशिक येथे आडगाव हद्दीत आल्यावर त्याला अंबड पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. विठ्ठलकर सराईत गुन्हेगार असून त्र्यंबकेश्वर येथे काही वर्षापूर्वी झालेल्या दुहेरी हत्याकांडात त्याचा सहभाग होता. कारागृहात असतांना त्याने तेथील पोलिसांवर हल्ला केला होता.