वाचनालयाशी सर्वसामान्य वाचक कसा जोडला जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नव्या कार्यकारिणीकडून नमूद
नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेवर २०२२-२७ या पंचवार्षिकासाठी झालेल्या निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यात ग्रंथालय भूषण पॅनल यशस्वी झाले आहे. कार्यकारिणी मंडळ सदस्यत्वाच्या १५ पैकी १२ जागा ग्रंथालय भूषणने जिंकल्या असून ग्रंथमित्र पॅनलला केवळ तीनच
जागा मिळाल्या. मंगळवारी रात्री उशिरा हा निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रंथालय भूषणच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वाचनालयाशी सर्वसामान्य वाचक कसा जोडला जाईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवीन कार्यकारिणीने नमूद केले.
सावाना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत याआधीच ग्रंथालय भूषणचे प्रा. दिलीप फडके आणि उपाध्यक्षपदी प्रा. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव हे निवडून आले आहेत. निवडणुकीत वर्चस्व मिळविल्यानंतर वाचनालयाचा अध्यक्ष म्हणून वेगवेगळय़ा पातळीवर काम करावे लागणार असल्याचे प्रा. फडके यांनी सांगितले.
सर्वप्रथम वाचनालयाशी संबंधित असणारे वाद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यात न्यायालयीन, अंतर्गत वादांचा समावेश आहे. शहराचा विस्तार वेगाने होत आहे. शहर उपनगरांमध्ये पसरले असताना वाचनालय तिथे कसे पोहोचेल, यासाठी काम करावे लागणार आहे. सर्वसामान्य वाचक वाचनालयाशी कसा जोडला जाईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
उपाध्यक्षपदी निवड झालेले वैद्य जाधव यांनी सध्याच्या उपक्रमांचा आढावा घेत नव्याने मांडणी करावी लागेल काय, याची माहिती घेत कामाचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले. बंद पडलेले उपक्रम नव्याने कसे सुरू करता येईल, हेही पाहण्यात येईल, असे त्यांनी मांडले.
सावानाच्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष- प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष- प्रा. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव, कार्यकारिणी सदस्य- ग्रंथालय भूषणचे संजय करंजकर, प्रेरणा बेळे, जयेश बर्वे, जयप्रकाश जातेगावकर, अभिजीत बगदे, देवदत्त जोशी, सुरेश गायधनी, डॉ. धर्माजी बोडके, गिरीश नातू, सोमनाथ मुठाळ, मंगेश मालपाठक, उदयकुमार मुंगी तसेच ग्रंथ मित्रचे प्रशांत जुन्नरे, श्रीकांत बेणी, भानुदास शौचे यांचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th May 2022 रोजी प्रकाशित
‘सावाना’ निवडणुकीत ‘ग्रंथालय भूषण’ला १५ जागा, ‘ग्रंथमित्र’चे ३ उमेदवार विजयी
कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेवर २०२२-२७ या पंचवार्षिकासाठी झालेल्या निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यात ग्रंथालय भूषण पॅनल यशस्वी झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-05-2022 at 00:02 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savannah election library bhushan candidates granthamitra wonthe new executive will find out general reader connected library amy