नाशिक – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सहसा कोणाची स्तुती करीत नाहीत, असे म्हटले जाते. त्यामुळेच शरद पवार यांनी स्तुती केलेली व्यक्ती किंवा संस्था नक्कीच काहीतरी विशेष कार्य करीत असणार, याची सर्वांना खात्री पटते. राष्ट्रवादीचे (शरद पवार) पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी नाशिक येथे काढण्यात आलेला आक्रोश मोर्चा या दोन्ही कार्यक्रमांसाठी शरद पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला. परंतु, या दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्त शरद पवार हे जिल्ह्यातील अजून एका ठिकाणी गेले. सध्या त्यांच्या या दौऱ्याची आणि त्यांनी स्तुती केलेल्या संस्थेछी चर्चा आहे.
नाशिक येथील आक्रोश मोर्चा संपल्यानंतर शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेते, पदाधिकाऱ्यांचा ताफा जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे वळाला. हा ताफा पोहचला देवळा येथे.
या ठिकाणी शिवनिश्चल सेवाभावी संस्थेच्या वतीने अनाथांना मदतनिधी आणि शिवनिश्चल पूरस्कार सोहळ्याचे आयोजन शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले. ज्यांना आई-वडिलांचा आधार नाही, अशा अनाथांना दत्तक घेवून त्यांच्या आयुष्यात आधार बनून त्या़ंचे जीवनमान वाढविण्यासाठी शिवनिश्चल सेवाभावी संस्था पुढाकर घेत आहे.
अनाथांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याचे काम यशवंत गोसावी आणि त्यांची शिवनिश्चल संस्था करीत असून हे मानवधर्माची सेवा करण्याचे काम आहे. हे काम असेच करीत राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री जयंत पाटील होते. व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, खासदार भास्कर भगरे, खासदार निलेश लंके, विलास बडे, मंगेश चिवटे,मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, निंबाबाई सूर्यवंशी, देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा प्राचार्य हितेंद्र आहेर, बंडुकाका बच्छाव, देवळा मर्चंट बँकेचे अध्यक्ष कोमल कोठावदे आदी उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी, शेतमालाच्या धरसोड आयात-निर्यात धोरणाबद्दल केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली.
अर्थखाते नेहमीच उद्योजकांची कर्जमाफी करते. मात्र शेतीविषयक धोरण ठरवले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.डॉ.डी.के.आहेर यांनी केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात पाच अनाथ आणि निराधार मुलांना शालेय साहित्य व धनादेशाचे वाटप करण्यात आले. या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू मांडला.
समाजाची जडणघडण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही १२७ पेक्षा जास्त अनाथ व निराधार मुलांचे पालकत्व निभावत आहोत, असे त्यांनी नमूद केले. निवेदक विलास बढे यांना शिवनिश्चल पुरस्कार, शिंदेशाही पगडी व मानपत्र देत सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना बडे यांनी, शेतीमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. खासदार सुळे, जयंत पाटील, खासदार भगरे, खासदार लंके यांनी मनोगतातून मदतनिधी उपक्रमाचे कौतुक केले.
अनाथ मुले शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहावीत, यासाठी यावेळी निंबाबाई सूर्यवंशी यांनी खारीपाडा (ता.देवळा) येथील तीन एकर जागा शिवनिश्चल ट्रस्टला दान दिल्याने त्याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या ‘शिवाधार’चे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे मंगेश चिवटे यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश या ट्रस्टकडे सुपूर्द केला. प्रारंभी शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्यांनी शाहिरी गीते व पोवाडे सादर केली. सूत्रसंचालन पूनम गोसावी आणि भगवान आहेर यांनी केले.
