नाशिक : आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तयारीला सुरुवात केली असून त्याअंतर्गत नाशिक येथे रविवारी पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर घेतल्यानंतर सोमवारी ईदगाह मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी मैदानात जमा झाले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आगमन अद्याप झालेले नाही.
आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्रितपणे लढतील की स्वतंत्रपणे, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मनसे आणि शिवसेनेची (उध्दव ठाकरे) होणारी जवळीक पाहता ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी असावी, या अनुषंगाने शरद पवार गटाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागात मेळावे घेत आहेत. नाशिक येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेले पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर त्याचाच भाग होता. या शिबिरात शरद पवार यांच्यासह पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.
शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरुन राज्यात निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य केले. सरकार कोणत्याही जातीधर्माचे नसावे. सरकार सर्वांचं आणि व्यापक असावं. सरकारने कोणत्याही एका जातीची समिती न करता ती समाजाची करावी. सरकार सर्वांचे असावे. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य राहिले आहे. सामाजिक ऐक्य जपले गेले पाहिजे. आता या ऐक्यालाच तडा बसत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनीही या विषयाला विशेष महत्व दिले होते.
या शिबिरानंतर सर्वांचे लक्ष आक्रोश मोर्चाकडे लागले आहे. या मोर्चाची तयारी पक्षाकडून अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. मोर्चासाठी ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. बैलगाडीही मोर्चासाठी आणण्यात आली आहे. मोर्चाच्या ठिकाणी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार, रोहिणी खडसे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत. शरद पवार अद्याप मैदानात आलेले नाहीत. विधानसभा निवडणूक प्रचारात महायुतीकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, पुन्हा सत्ता मिळाल्यानंतरही अद्याप कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही. कर्जमाफी त्वरीत जाहीर करावी, कांद्याची मुक्त निर्यात सुरु करावी, कापसाची आयात थांबवावी, शेतीमालाला हमी भाव द्यावा, यासह इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील कांदा आणि केळी उत्पादकही मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिकमध्ये आले आहेत.