जळगाव – जिल्ह्यातील अमळनेरमध्ये शेतीप्रश्नी जनआक्रोश मोर्चा काढल्यानंतर प्रशासनाला निवेदन देताना शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी बुधवारी भाजपच्या महिला खासदारांबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकाराचा भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारी तीव्र निषेध केला.

जळगावमध्ये गेल्या महिन्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी शेतीप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्याच धर्तीवर बुधवारी अमळनेरमध्ये माजी खासदार पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.

यादरम्यान, अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, कर्जमाफी करून सात बारा उतारे कोरे करावेत आणि खरीप पिकांना पीक विमा मंजूर करावा, या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. प्रसंगी स्थानिक प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी, मोर्चात सहभागी शेतकऱ्यांना संबोधित करताना माजी खासदार पाटील यांनी जळगावच्या विद्यमान खासदार स्मिता वाघ यांच्यावर टीका केली. तसेच त्यांचा समाज माध्यमावरील संदेश वाचून दाखवत आपण अपघाताने खासदार झालात, असे वक्तव्य करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याशिवाय, प्रशासनाला जाब विचारतानाच तुम्हाला काहीच न बोलणाऱ्या ताई आणि दादा यांनाही ××× द्यायला पाहिजे, असे वक्तव्य माजी खासदार पाटील यांनी जाहीरपणे केले. त्यांच्या त्या वक्तव्याचा तीव्र निषेध गुरूवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जळगावमध्ये केला.

खासदार वाघ या भाजपच्या अनुभवी तसेच प्रभावशाली पदाधिकारी आहेत. असे असताना, माजी खासदार पाटील यांनी महिला लोकप्रतिनिधीबद्दल अपशब्द वापरणे हे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ते स्वतः कसे अपघाती खासदार झाले होते, हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे इतरांवर टीका करण्याआधी त्यांनी स्वतःच्या राजकीय कारकिर्दीचा विचार आधी करावा.

भाजप आता केवळ निषेधावर थांबणार नाही. माजी खासदार पाटील यांनी जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध लवकरच अब्रू नुकसानीचा दावा आणि गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील अमेय राणे, भूषण भोळे, मुविकोराज कोल्हे, राहुल पाटील, संजय भोळे, किशोर चौधरी, सचिन साळुंखे, संजय चौधरी यांनी दिला.