वयोवृद्धांपासून युवावर्गाची फेरीद्वारे तुकाराम मुंढेंना साथ

सत्ताधारी भाजपने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या पाश्र्वभूमीवर, पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आयोजित ‘वॉक फॉर कमिशनर’ अंतर्गत शेकडो नागरिकांनी फेरीद्वारे महापालिकेवर धडक देत आयुक्तांच्या कार्यपद्धतीला उत्स्फूर्त पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या बदलीचा प्रयत्न झाल्यास नाशिककर पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. या फेरीत  ७५ ते ८० वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी, चिमुरडय़ाला घेऊन आलेल्या मांताचाही समावेश होता.

मुंढे यांना हटविण्यासाठी भाजपने दाखल केलेला अविश्वास ठराव मागे घेत असल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी सकाळी करण्यात आली. तरीही ‘आम्ही नाशिककर’अंतर्गत एकवटलेल्या नागरिकांनी पूर्वनियोजित ‘वॉक फॉर कमिशनर’द्वारे आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सुरू झालेल्या फेरीत युवावर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाला.

‘आदर करा, आदर करा, जनमताचा आदर करा’, मुंढे आम्हाला हवे आहेत’ आदी घोषणा देत आणि याच आशयाचे फलक हाती धरून शेकडो नागरिक महापालिकेच्या दिशेने मार्गस्थ झाले. याच मार्गावर असलेल्या महापौरांचा शासकीय रामायण बंगल्याजवळ काही काळ मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली. मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त बाणवली. पालिकेतील नियमबाह्य़ कामांवर फुली मारून भ्रष्ट कारभाराला चाप लावला. टक्केवारी बंद झाल्यामुळे त्यांचा विरोध होत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आयुक्तपदी मुंढे यांना कायम ठेवावे, ही निवेदनातून मांडलेली आमची भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत कळवावी, असे साकडे घालण्यात आले.

उन्हात निघालेल्या फेरीत महिला, युवावर्ग आणि काही जण सहपरिवार स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. केवळ मुंढे यांचे समर्थन करण्यासाठी कधीही न उतरलेले नााशिककर  रस्त्यावर उतरले. त्यातील एक म्हणजे पाईपलाईन रस्त्याला राहणारे बाळकृष्ण (७२) आणि त्यांची पत्नी पुष्पा दंडगावकर हे वृद्ध दाम्पत्यही सहभागी होते. प्रामाणिक अधिकाऱ्यावर अन्याय होत असून तो सहन न झाल्याने आपण त्यांना समर्थन देण्यासाठी आल्याचे दंडगावकर यांनी सांगितले. के. जी. कुलकर्णी (७५) हे पत्नी विजया आणि मुलगी अ‍ॅड. शर्मिष्ठा उपासनी यांच्यासमवेत आले होते. मुंढेंना विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे, असे त्यांचे म्हणणे होते. सीएचे शिक्षण घेणाऱ्या प्रगती मोरे चार वर्षीय मुलासह फेरीत आल्या. मुंढे यांच्या नियोजनामुळे शहर बदलत आहे. महापालिकेत कोणी सत्तेत असले तरी असे बदल झालेले नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. नाशिकरोड येथील सुलक्षणा गवळी या संगणकशास्त्राच्या पदवीधर. आज आपण रस्त्यावर उतरलो नाही तर चांगला अधिकारी गमवावा लागेल, या भीतीने त्या समर्थन फेरीत सहभागी झाल्या. अंबड येथील रमेश आणि लता शिंदे दाम्पत्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रिया या मुलीला घेऊन फेरीत आले. मुंढे यांच्यामुळे महापालिकेच्या कारभारात शिस्त लागल्याची त्यांची भावना होती. कोणी निमंत्रित केले नसताना स्वयंस्फुर्तीने सहभागी झालेले असे अनेक जण या फेरीत सहभागी होते.

आभारासाठी मुंढे प्रवेशद्वारावर

आयुक्त मुंढे यांनी फेरीत सहभागी झालेल्या नागरिकांचे प्रवेशद्वारावर येऊन आभार मानले. शहरवासीयांनी ज्या प्रकारे पाठिंबा दिला, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भावना पोहोचल्या आहेत. शहराच्या विकासासाठी आपल्याला कसे काम करता येईल याचा विचार करू. त्यात नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. आपण फेरीत शांततेच्या मार्गाने सहभागी झाला. ती झाल्यानंतर वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेऊन शांततेत जावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी मुंढे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.