नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर राज्य मार्गाची बिकट अवस्था झाली असून ३० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासाभराचा अवधी लागतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाताना ही परिस्थिती असेल तर, ते दुदैवी आहे. पायाभूत सुविधांवर राज्य सरकार इतका निधी खर्च करीत असताना तो कुठे जातो, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) वतीने रविवारी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर पार पडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान खा. सुळे यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांना ३० किलोमीटरचे अंतर मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येकी एक तास म्हणजे जवळपास दोन तास लागले. या राज्य मार्गाची अतिशय वाईट अवस्था आहे. जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करणे जिकीरीचे झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मार्गावरून भाविकांची ये-जा असते. सध्या रस्त्याची अवस्था पाहता हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि सोयीचा राहिलेला नाही, असे त्यांनी समाजमाध्यमांवरही नमूद केले. याच संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खा. सुळे यांनी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. महत्वाच्या ज्योतिर्लिंगाकडे जाणाऱ्या रस्त्याची ही परिस्थिती दुदैवी आहे. आलेला निधी कुठे जातो, असा प्रश्न केला.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे रस्त्यांकडे बारकाईने लक्ष असते. एखादा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला नसल्याची आम्ही त्यांच्याकडे तक्रार केल्यास ते लगेच संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकतात. अशी अनेक उदाहरणे असून महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती नाही, असे सांगत त्यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले. इतका निधी विकासासाठी दिल्याचे सांगितले जाते. कामाचा दर्जा नसेल तर चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वर चारपदरी राज्य मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. सध्या डांबरी असणारा हा रस्ता सिमेंट कॉक्रिटचा करण्याचे नियोजन आहे. हे काम होईपर्यंत भाविकांना खड्डेमय मार्गावरून प्रवास करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.