लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: भुसावळ तालुक्यातील फेकरी येथील तरुणाचा दुचाकीवरून ढकलून दिल्याने डोक्याला मुका मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. फेकरी उड्डाणपुलाजवळील साकरी समांतर रस्त्यावर ही घटना घडली.

याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक करण्यात आली आहे. मंगल शेळके (२३, फेकरी, ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगल याच्याशी पूर्ववैमनस्यातून राहुल पाडळे (२८) याचा वाद झाला. त्यावेळी दोघांमध्ये झटापटही झाली. राहुलने मंगलची कॉलर पकडून शिवीगाळ केली. त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवित जोराने ढकलून दिले. त्यात तो फेकरी उड्डाणपुलाखाली पडल्याने डोक्याला मुका मार लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा… नाशिक: शिवसेनेतील उठावाला अजित पवार जबाबदार, गिरीश महाजन यांचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भुसावळ येथील रुग्णालयात दाखल केले असता, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताचा मोठा भाऊ आकाश शेळके (२५, रा. फेकरी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित राहुल पाडळे याला अटक केली आहे. दरम्यान, संशयित पाडळे याला न्यायालयात हजर केले असता, २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.