नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्योग विभागाकडून वेगवेगळ्या संकल्पनांवर काम सुरू आहे. उद्योजक आणि भाषा विभागाकडून साहित्यिकांसाठी तंबू निवासाची व्यवस्था केली जाणार आहे. तंबू शहराच्या माध्यमातून उद्योजकांना तसेच साहित्यिक-कलाकारांना आकर्षित केले जाणार आहे. तंबू घरासाठी अनेक उद्योजकांनी नोंदणीही केली असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या इमारतीचे सोमवारी मंत्री सामंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. व्यासपीठावर मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ यांसह सीमा हिरे, दिलीप बनकर, सराेज अहिरे, हिरामण खोसकर हे आमदार तसेच औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सामंत यांनी, कुंभमेळ्यात जगभरातून येणाऱ्या उद्योजकांची राहण्याची आणि दर्शनाची सोय तंबू शहराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे सांगितले. उद्योजकांना एमआयडीसीची प्रगती, कौशल्य केंद्रे, नाशिकची औद्योगिक क्षमता दाखविण्यात येणार आहे. या प्रयत्नांतून किमान १० उद्योगांची उभारणी पुढील कुंभमेळ्यापर्यंत करण्याचा मानस असल्याचेही सामंत यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यिक व कलाकारांसाठीही तंबू निवासाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. उद्योजकांसाठी उद्योग विभागाकडून मापारवाडी, इगतपुरी, जांबुटके, राजूरबहुला सिन्नरसह माळेगाव मध्ये भूसंपादनाची प्रक्रिया जोरात सुरू असलल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक महामंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास केंद्र हा उपक्रम राज्यात इतर पाच ठिकाणी राबवला जात आहे. पुढील तीन ते चार वर्षात आठ हजारहून अधिक प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, हा संकल्प घेऊनच केंद्राची उभारणी होत आहे. नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे देशातील पहिले आदिवासी सामूहिक औद्योगिक विकास केंद्र (क्लस्टर) उभारण्यात येणार असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधीही वितरित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, उद्योजक व प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शुष्क बंदराचा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. नाशिकमध्ये डिफेन्स हब आणि इलेक्ट्रिकल सामूहिक विकास केंद्र होण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी मंत्री झिरवळ यांनी शेतीला जोडउद्योग नाशिकमध्ये आणावेत, अशी मागणी केली. मंत्री दादा भुसे यांनी, उद्योग मंत्र्यांचे नाशिककडे विशेष लक्ष असून कौशल्य विकास केंद्र लोकार्पण हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद केले. नाशिक जिल्हा उद्योग आणि शेती व्यवसायातही आघाडीवर आहे. त्यामुळे शेती निगडित उद्योग व्यवसाय नाशिकमध्ये आणावेत, अशी मागणी भुसे यांनी केली.