लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: गरीबांसाठी घरकुल मिळावे म्हणून शासन एकीकडे प्रयत्न करीत असतांना दुसरीकडे काही शासकीय लोकसेवक या कामात लाच मागून अडथळे निर्माण करीत आहेत. अशीच एक घटना इगतपुरी तालुक्यातील अधरवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासंदर्भात घडली आहे. रमाई घरकुल योजनेचा प्रस्ताव देऊन घराची मंजुरी आणली म्हणून त्याने पाच हजाराची मागितलेली लाच त्याच्या चांगलीच अंगलट आली आहे. 

घरकुलाला मंजुरी आणून दिल्याच्या मोबदल्यात एका तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अधरवड ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक हंसराज बंजारा (५२) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. घरकुलाच्या प्रस्तावाला मंजुरी आणून देऊन घरकुलाचे शासकीय हप्ते विनाअडथळा बँक खात्यावर जमा करायचे होते. या कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच ग्रामसेवक बंजाराने स्वीकारली. म्हणून त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… शासकीय योजनांच्या प्रचारार्थ शिवदूत; शिवसेनेचे नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर, नाईक प्रवीण महाजन, प्रभाकर गवळी, नितिन कराड, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली. कोणी शासकीय अधिकारी लाच मागत असेल तर आमच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले असुन संबधित तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.