धुळे : जिल्ह्यातील साक्री येथे गोळीबार करणाऱ्यांचा तपास लागलेला नसताना धुळ्यातील सावरकर चौकात गोळीबार करून तिघांनी मुंबई येथील जव्हेरी बाजारातील ‘व्ही.एम.ज्वेलर्स’च्या विक्री प्रतिनिधीच्या हातातील बॅग खेचून लूट केली.बॅगेत सुमारे ७० लाख रुपयांचे १२०० ते १५०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पावत्या होत्या. मोटार सायकलवर आलेल्या लुटारुंपैकी एकाने जमिनीवर आणि नंतर हवेत गोळीबार केला. दहशत निर्माण करून काही कळण्याच्या आत बॅग हिसकावली. नदीकाठच्या रस्त्याने मुंबई-आग्रा महामार्गाकडे निघून गेले.
यासंदर्भात विनय जैन (२८, रा. जय अपार्टमेंट, ६० फुटी रस्ता, बी विंग १०५, भाईंदर, जि. ठाणे) यांनी देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार धुळ्यातील पांझरा नदीकाठी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यासमोर बुधवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. शहाद्याहून (जि. नंदुरबार) निघालेली बस बुधवारी रात्री आठ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्या जवळ थांबली. या बसमधून मुंबई येथील व्ही.एम. अँड सन्स ज्वेलर्स लिमिटेडचे ( अत्तरवाला बिल्डिंग,दुसरा मजला, मिर्झा स्ट्रीट, मुंबई) विक्री प्रतिनिधी विनय जैन आणि कर्शन मोदी हे उतरले. ते काही अंतर जात नाही तोच दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने जमिनीवर आणि हवेत गोळ्या झाडल्या. दहशत निर्माण केली. काही कळण्याच्या आत दुचाकीवरील तिघांनीही जैन यांच्याकडची बॅग हिसकावून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन काडतुसे पोलिसांच्या हाती लागले.
विनय जैन आणि मोदी यांच्याकडील बॅगेत तीन किलोहून अधिक सोने असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात मात्र ७० लाख रुपयांचे १२०० ते १५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. घटना घडल्यावर घाबरलेल्या विनय जैन आणि किशन मोदी यांना देवपूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
देवपूरचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांच्या उपस्थितीत रात्री एक वाजेला पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद केली. लुटारुंनी पाहणी करुन किंमती ऐवज लांबविल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढला. संशयित तिघांपैकी दोघांकडे बंदूक होती ,अशी माहिती विनय जैन आणि किशन मोदी यांनी पोलिसांना दिली. जैन आणि मोदी हे २१ जुलैपासून धुळे परिसरात दागिन्यांच्या व्यवहारासाठी मुक्कामी होते. त्यांनी बुधवारी अक्कलकुवा आणि तळोदा (जि नंदुरबार) येथील काम आटोपले. आणि शहादा येथून रात्रीच्या बसने धुळ्याला परतले. यावेळी ही घटना घडली.
या घटनेतील संशयितांच्या शोधासाठी तत्काळ वेगवेगळी आठ विशेष शोध पथके तयार करण्यात आली. ही सर्व पथके संशयितांचा लवकरच माग काढण्यात यशस्वी होतील.समाधान वाघ (पोलीस निरीक्षक, देवपूर पोलीस ठाणे, धुळे)